राज्यपाल-मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव : बेळगावातील चौघांचा समावेश
बेळगाव : बेळगावसह राज्यातील 106 अधिकारी व पोलिसांना राष्ट्रपतींचे पदक बहाल करण्यात आले. शनिवार दि. 30 ऑगस्ट रोजी बेंगळूर येथील राजभवनमध्ये झालेल्या विशेष कार्यक्रमात 2022 व 2023 या दोन वर्षांसाठी प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिनी जाहीर झालेले राष्ट्रपती पदक देऊन अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
विशिष्ट सेवा पदक व उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपती पदकांची घोषणा झाली असली तरी पुरस्कार वितरण सोहळा झाला नव्हता. शनिवारी हा कार्यक्रम झाला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते अधिकारी व पोलिसांना पदक बहाल करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, राज्य पोलीस महासंचालक डॉ. एम. ए. सलीम आदी उपस्थित होते.
विजापूरचे निवृत्त जिल्हा पोलीसप्रमुख शंकर मारिहाळ, बेळगाव ग्रामीणचे एसीपी गंगाधर बी. एम., जिल्हा पोलीस मुख्यालयातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. बी. शिंदे, एआरएसआय दस्तगीर मोहम्मदहनीफ घोरी, मंगळूरचे एसीपी प्रताप थोरात, यापूर्वी बेळगावात सेवा बजावलेले व सध्या बेंगळूर येथील संपिगेहळ्ळी उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक मुरगेंद्रय्या आदींना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपतींचे पदक बहार करण्यात आले.
याच कार्यक्रमात एडीजीपी बी. दयानंद, आयजीपी बी. आर. रविकांतेगौडा, आयजीपी लाभूराम, बेंगळूरचे पोलीस आयुक्त सीमंतकुमार सिंग, एडीजीपी एस. मुरगन, बेळगावचे या आधीचे जिल्हा पोलीसप्रमुख व सध्या राज्य राखीव दलाच्या आयजी पदावर सेवा बजावणारे संदीप पाटील आदी अधिकाऱ्यांसह एकूण 106 पोलीस अधिकाऱ्यांना ग्लास हाऊसमधील कार्यक्रमात राष्ट्रपती पदक देण्यात आले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पोलीस दलात विशिष्ट पद्धतीने व प्रामाणिकपणे सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांचा सेवा मनोभाव, परिश्रम, सामाजिक जाणीव ठेवून सेवा बजावली तरच अशा विशिष्ट पुरस्कारासाठी ते पात्र ठरतात. खबरदारी घेतली तर अनेक गुन्हे रोखता येणे शक्य आहे. अनुसूचित जाती-जमातींवरील अत्याचार प्रकरणांच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या डीसीआरई पोलीस स्थानकांनी प्रभावीपणे काम करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.









