दोघा जणांना अटक, आणखी दोघे फरारी
बेळगाव : आरसीबीच्या विजयोत्सवादिवशी पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करून एका तरुणावर चाकूहल्ला केल्याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी दोघेजण फरारी असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिली. सोमवारी पत्रकारांशी बोलताना पोलीस आयुक्तांनी नशेत कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना इशाराच दिला आहे. नशेत गोंधळ घालणे, धारदार शस्त्रs घेऊन फिरणे आदी प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देतानाच चाकूहल्ला प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांवर रौडी शिट उघडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सूरजसिंग रजपूत (वय 33), प्रतीक पाटील (वय 24) दोघेही राहणार अयोध्यानगर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. न्यायालयासमोर हजर करून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. दि. 3 जून रोजी रात्री आरसीबीने आयपीएल जिंकल्यानंतर राणी कित्तूर चन्नम्मा चौकाजवळ जल्लोष साजरा करताना या दोघा जणांनी पोलीस अधिकाऱ्यालाही धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका आरामबसमधून जल्लोष साजरा करीत ही मंडळी चन्नम्मा सर्कल चौकात पोहोचली.
नियम धाब्यावर बसवून वाहन चालविल्याने मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर यांनी खासगी आराम बसचालकाला जाब विचारला. त्यावेळी झालेल्या वादावादीनंतर पोलीस अधिकाऱ्यांनाही धक्काबुक्की झाली. या प्रकारानंतर बसची आणखी एका वाहनाला धडक बसली. शिवकुमार (वय 26) राहणार ऑटोनगर हा तरुणही विजयोत्सवासाठी आला होता. आपल्या वाहनाला धडक देऊन सुसाट वेगाने जाणाऱ्या बसचा पाठलाग करीत अयोध्यानगर येथे त्याने जाब विचारला. त्यावेळी चौघा जणांनी रॉड व चाकूने त्याच्यावर हल्ला केला. या घटनेच्या दोन दिवसांनंतर दोघा जणांना अटक करण्यात आली असून आणखी दोघेजण फरारी आहेत. त्यांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.









