बलात्कार-हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट केल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ कोलकाता
कोलकात्यातील महिला डॉक्टरवर बलात्कार आणि तिच्या हत्येप्रकरणी सीबीआयने माजी प्राचार्य संदीप घोष तसेच पोलीस अधिकारी अभिजीत मंडल यांना अटक केली आहे. दोघांवरही पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे.
अभिजीत मंडल हा ताला पोलीस स्थानकात स्टेशन हाउस ऑफिसर म्हणून तैनात आहे. शनिवारी रात्री उशिरा त्याला वैद्यकीय तपासणीसाठी बीआर सिंह रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर सीबीआयने त्याला कोलकात्यातील स्पेशल क्राइम बँच येथे नेले. संदीप घोष आणि अभिजीत मंडलच्या अटकेनंतर आरोग्य भवनाबाहेर निदर्शने करणाऱ्या डॉक्टरांनी आनंद व्यक्त केला.
आरजी कर रुग्णालयातील बलात्कार तसेच हत्येप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपी संजय रॉयला कोलकाता पोलिसांनी गुन्ह्याच्या दुसऱ्याच दिवशी अटक केली होती. तर संदीप घोषला सीबीआयने आरजी कर वैद्यकीय रुग्णालयातील भ्रष्टाचाराप्रकरणी अटक केली होती. सीबीआयने त्यांची पॉलिग्राफ टेस्टही करविली होती.
महिला डॉक्टरच्या हत्येच्या दुसऱ्याच दिवशी घोषने सेमिनार हॉलला लागून असलेल्या खोल्यांच्या नुतनीकरणाचा आदेश दिला होता. प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह 9 ऑगस्ट रोजी सकाळी सेमिनार हॉलमध्येच आढळून आला होता. संदीप घोषने सार्वजनिक बांधकाम विभागाला सेमिनार हॉलला लागून असलेल्या खोल्या आणि टॉयलेटचे नुतनीकरण करण्यास सांगितले होते. या अनुमती पत्रावर घोष यांची स्वाक्षरी देखील आहे. विभागाने संबंधित काम सुरू केले होते, परंतु महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व्यापक निदर्शने सुरू केल्याने नुतनीकरणाचे काम रोखण्यात आले होते.
संदीप घोषला महाविद्यालयातील भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने 16 ऑगस्ट रोजीच ताब्यात घेतले होते. 24 ऑगस्ट रोजी त्याच्या विरोधात वित्तीय अनियमिततेचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. सीबीआयने ही कारवाई कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केली होती. यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने 28 ऑगस्ट रोजी संदीप घोषचे सदस्यत्व निलंबित केले होते.









