केंद्रीय गृह मंत्रालयाला प्राथमिक अहवाल सादर
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशभरातील लोकांना हादरवून सोडणाऱया दिल्लीतील कंझावाला प्रकरणाबाबत दिल्ली पोलिसांनी आपला प्राथमिक अहवाल गृह मंत्रालयाला सादर केला आहे. प्राथमिक तपासाअंती देण्यात आलेल्या या अहवालात पोलिसांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. यासोबतच, या प्रकरणात पीसीआर टीमच्या कृतीमध्येही त्रुटी असल्याचे म्हटले आहे.
नववर्षाच्या प्रारंभी दिल्लीत घडलेल्या कंझावाला प्रकरणाची गृह मंत्रालयाने दखल घेतल्यानंतर दिल्ली पोलीस सक्रीय झाले आहेत. मात्र नुकत्याच आलेल्या अहवालात पोलिसांचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला होता. खुद्द केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी एसपी शालिनी सिंह यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल बुधवारी गृह मंत्रालयाकडे सोपवण्यात आला. या प्राथमिक अहवालात दिल्ली पोलिसांच्या निष्काळजीपणावर ठपका ठेवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना घटनास्थळापर्यंत पोहोचण्यास विलंब झाल्याची नोंद अहवालात आहे. पोलीस घटनास्थळी तातडीने पोहोचले असते तर मुलीचे प्राण वाचू शकले असते, असेदेखील या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणात कमालीचे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
नववर्षाच्या जल्लोषादरम्यान राजधानी दिल्लीतून हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली होती. दिल्लीच्या कंझावाला भागात कारमधून प्रवास करणाऱया काही युवकांनी एका युवतीच्या स्कुटीला धडक दिली. या दुर्घटनेनंतर युवक कारमधून पलायन करत असताना युवती कारच्या चाकात अडकून पडल्यानंतर काही किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेल्याने तिचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर युवतीच्या मृतदेहावर कपडय़ाचा एकही तुकडा शिल्लक नव्हता. रक्तबंबाळ युवतीने रस्त्यावरच अखेरचा श्वास घेतला होता. पोलिसांनी याप्रकरणी 5 युवकांना अटक केली असून कारही जप्त करण्यात आल्याची माहिती आउटर दिल्लीचे पोलीस उपायुक्त हरेंद्र सिंह यांनी दिली आहे.









