पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांचे स्मरण
बेळगाव : पोलीस हुतात्मा दिनानिमित्त शनिवारी सकाळी डीएआर मैदानावर पोलीस हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना मानवंदना देण्यात आली. गेल्या वर्षभरात हौतात्म्य पत्करलेल्या पोलीस हुतात्म्यांच्या त्याग व बलिदानाचे यावेळी स्मरण करण्यात आले. जिल्हाधिकारी नितेश पाटील, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद आदींसह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही हुतात्मा दिन कार्यक्रमात भाग घेतला होता. विविध फुलांनी हुतात्मा स्मारक सजविण्यात आले होते. वेगवेगळ्या संघटना, पोलीस दल व नागरिकांच्यावतीने हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, पी. व्ही. स्नेहा, गुप्तचर विभागाचे पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी, लोकायुक्त विभागाचे पोलीसप्रमुख हनुमंतराय आदींसह बेळगाव शहर व जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस व अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.









