रामतीर्थनगर येथे 20 लाखाच्या रोकडसह दीड लाखाचे दागिने पळविले
बेळगाव : शहर व उपनगरांत घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. चोऱ्या, घरफोड्या रोखण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. रामतीर्थनगर येथील बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे 22 लाखाचा ऐवज पळविण्यात आला आहे. सोमवारी ही घटना उघडकीस आली असून माळमारुती पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. अभिजित अजित अवटी यांच्या रामतीर्थनगर येथील घरात चोरीची घटना घडली आहे. अभिजित व त्यांचे कुटुंबीय 9 जून रोजी पहाटे आपल्या घराला कुलूप लावून देवदर्शनासाठी धर्मस्थळला गेले होते. सोमवारी पहाटे हे सर्वजण देवदर्शनाहून घरी परतले. त्यावेळी घराचा दरवाजा उघडा होता. देवदर्शनासाठी जाताना अभिजित यांनी आपल्या मित्राला दोन दिवस घरी रहायला सांगितले होते. 11 जून रोजी सकाळी 6 वा. अभिजित यांच्या घराला कुलूप लावून त्यांचा मित्र आपल्या घरी गेला. त्यामुळे रविवारी घरात कोणीच नव्हते. हीच संधी साधून चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला आहे. घरातील 21 लाख 47 हजाराचा ऐवज पळविला आहे. तिजोरीतील 20 लाख रुपये रोकड व 1 लाख 47 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने असा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. 35 ग्रॅम सोन्याची चेन, चांदीची समई, आरती सेट, तांब्या, चांदीची गणेशमूर्ती, दिवा, ब्रेसलेट, करदोळा अशी पाऊण किलो चांदी व 35 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळविले आहेत. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात गुन्हे वाढले आहेत. रामतीर्थनगर येथील चोरीचा माग काढण्यात पोलिसांना अपशय आले. निष्क्रिय पोलीस यंत्रणेमुळे नागरिकांच्या मालमत्तांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.









