गोळीबारानंतर सुरक्षा व्यवस्थेत वाढ
वृत्तसंस्था/ गया
बिहारच्या बोधगया येथील महाबोधि मंदिर परिसरात शुक्रवारी गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर महाबोधि मंदिर परिसराच्या चहुबाजूला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गोळीबाराच्या घटनेत अमरजीत यादव पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. अमरजीत यादव यांना तीन गोळ्या लागल्या होत्या. तर गोळीबार कुणी केला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
गोळीबाराच्या घटनेनंतर पर्यटक तसेच पत्रकारांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले आहे. महाबोधि मंदिर परिसरात गोळीबारानंतर सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याची माहिती गयाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आशीष भारती यांनी दिली आहे. परंतु त्यानी मंदिर परिसरातील गोळीबाराच्या घटनेचे कारण स्पष्ट केलेले नाही. पाटणा येथून एफएसएल पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून स्थानिक पोलीस स्वत:च्या स्तरावर या घटनेचा तपास करत आहेत.









