महानगरपालिका आरोग्याधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना शहापूर पोलिसांकडून नोटीस : पोलीस चौकशी सुरू झाल्याने धास्ती
बेळगाव : नाझर कॅम्प वडगाव येथील एका जिवंत महिलेला मृत्यू दाखला दिल्याप्रकरणी शहापूर पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. बुधवारी पोलिसांनी चौकशीला हजर राहण्यासंदर्भात महापालिका आरोग्याधिकाऱ्यांसह कर्मचारी व विमा कंपनीतील काहींना नोटीस बजावली आहे. सदर प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू झाल्याने या प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नाझर कॅम्प वडगाव येथील एका जिवंत महिलेला महापालिकेकडून मृत्यू दाखला देण्यात आला आहे. जून महिन्यात हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ माजली होती. वडगाव स्मशानभूमीतील एका कर्मचाऱ्याने मृत्यू दाखल्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे संकलित केली होती. शिवाय या कामासाठी 50 हजार रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले होते.
ज्या व्यक्तीने आपल्या जिवंत पत्नीचा मृत्यू दाखला काढला, त्याच व्यक्तीकडून या कर्मचाऱ्याने पैसे घेतल्याचे बोलले जात आहे. तसेच मृत्यू दाखला मिळविण्याची आयडिया त्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला दिली, असेही त्या व्यक्तीनेच यापूर्वी सांगितले आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेत मनपा आयुक्तांनी आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्यासह चौघांना नोटीस बजावली होती. पण पुढे त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. वडगाव स्मशानभूमीतील त्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचा प्रस्तावदेखील तयार झाला होता. मात्र अचानक निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली. महापालिकेत जन्म व मृत्यू दाखला वितरण प्रकरणात या आधीदेखील असे प्रकार घडले आहेत. जन्म व मृत्यू दाखले मिळविण्यासाठी नागरिकांना आटापिटा करावा लागतो. अर्ज दाखल करण्यास विलंब झाला तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची सक्ती केली जाते.
दाखले मिळविण्यासाठी सामान्य नागरिकांना एजंटाची मदत घ्यावी लागते. अनेक दिवस पाठपुरावा केला तरी दाखले मिळत नाहीत. असे असताना जिवंत महिलेचा मृत्यू दाखला मात्र लगेचच दिला जातो. त्यामुळे पैसे दिले की, महापालिकेतून कोणतीही कागदपत्रे मिळविता येतात का? असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. इतकेच नव्हेतर जन्म दाखल्यातील नावात बदल करण्यासाठी बनावट मॅरेज सर्टिफिकेट जोडण्यात आल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. नाझर कॅम्प येथील जिवंत महिलेला मृत्यू दाखला देण्यात आल्याचे प्रकरण दाबले गेल्याची चर्चा होती. मात्र विमा कंपनीने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. बुधवारी शहापूर पोलिसांनी महापालिकेत आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्यासह काहींना नोटीस देऊन चौकशीसाठी पोलीस स्थानकात हजर राहण्याची सूचना केली आहे. केवळ महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी नव्हेतर यामध्ये विमा कंपनीतील अधिकारी व कर्मचारी सहभागी असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे त्यांना नोटीस देऊन चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे.









