मंगळवेढा :
मंगळवेढा पोलिस ठाण्याचे विद्यमान पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांची तडकाफडकी सोलापूर येथे बदली झाल्याचा आदेश मंगळवेढा पोलिस स्टेशनला शनिवारी दुपारी प्राप्त झाला. त्यांच्या जागी सोलापूर दहशतवाद विरोधी शाखा येथून पोलिस निरिक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे हे रूजू झाले असून त्यांनी दुपारी 2.00 वा. आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे.दरम्यान, आपण लोकाभिमुख प्रशासन करण्यास अधिक प्राधान्य देणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले.
मंगळवेढयाचे पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांनी मागील सहा महिन्यापुर्वी पदभार घेतला होता.दरम्यान,दि.25 जानेवारी रोजी बोराळे बीट हद्दीत दोन पोलिस कर्मचार्यांचे लाच प्रकरण घडल्याने त्यांच्यावर बदलीची कुर्हाड कोसळली आहे.शनिवारी दुपारी पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून ढवाण यांच्या बदलीचा आदेश मंगळवेढा पोलिस प्रशासनास प्राप्त झाला असून त्यांची नेमणूक सोलापूर ग्रामीण कंट्रोल तथा दहशतवाद विरोधी शाखेकडे झाली आहे.पोलिस निरिक्षक बोरिगिड्डे हे तेथून मंगळवेढयास आले आहेत.ते सन 2005 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण होवून पोलिस खात्यात दाखल झाले आहेत. ते मूळचे सांगली येथील असून त्यांनी आत्तापर्यंत मुंबई,वर्धा,धाराशीव,कोल्हापूर येथे आपली सेवा बजावली आहे.पदभार स्विकारताच त्यांनी मंगळवेढा येथील कारागृहाला भेट देवून तेथील सुक्ष्म पाहणी केली.तसेच मंगळवेढा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्यांची बैठक घेवून कामकाजाबाबत महत्वाच्या सुचना केल्या.








