आटपाडी :
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेण्याच्या घटनेच्या तपासासाठी आटपाडीमध्ये सुरू असणारे बनपुरीकरांचे उपोषण मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी बनपुरीतील काळे कुटुंबियांसह नातेवाईक आक्रमक महिलांनी पोलीस निरीक्षक विनय बहीर यांना घेरावा घालून धारेवर धरले. उपोषणस्थळी आणि पुन्हा पोलीस ठाण्यातही महिलांच्या रूद्रावतारामुळे गोंधळ उडाली.
बनपुरी येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत तिच्या कुटुंबियांनी आटपाडी पोलीस तपासात हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप केला आहे. आटपाडी पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त करत आटपाडीत सोमवारपासून उपोषण सुरू आहे. गुन्हा दाखल करूनही जवळपास दोन महिने आरोपी जेरबंद होवून मुलगी ताब्यात कशी मिळत नाही, असा आरोप करत यात सहभागी अन्य लोकांचीही चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे.
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष डी.एम.पाटील, मोहन खरात यांच्यासह अनेकांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून पाठींबा दर्शविला. बनपुरी येथील काळे कुटुंबियांसह नातेवाईक व ग्रामस्थांनीही उपोषणस्थळी गर्दी करून पोलिसांच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
पोलीस निरीक्षक विनय बहीर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून चर्चा केली. त्यावेळी आक्रमक झालेल्या महिलांनी पोलीस अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करून दोन महिने आरोपी कसा सापडत नाही? असा सवाल करत जाब विचारला. पोलीस निरीक्षकांना घेरावा घालून आक्रमक महिलांनी त्यानंतर चर्चेवेळीही संताप व्यक्त केला. पुन्हा पोलीस ठाण्यात महिलांसह नातेवाईकग्रामस्थांनी पोलिसांना धारेवर धरले. बनपुरीतील अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने सुरू असणाऱ्या उपोषणाच्या दुसरी दिवशी महिलांनी घेतलेली आक्रमक भूमिका लक्षवेधी ठरली. त्यावेळी उपोषणस्थळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. पोलीस अधिकाऱ्यांनाच घेरावा घालून जाब विचारण्याच्या घटनेमुळे उपोषणाचा दुसरा दिवस चर्चेत आला.
यावेळी माया काळे, अंकुश काळे, अर्चना काळे, कल्पना काळे, अश्विनी काळे, अनिता काळे, कांता कोळपे, संगिता काळे, वर्षाराणी काळे, राजाक्का कोळपे, रूपाली घुटुकडे, वंदना मिसाळ, कोमल कोळपे, शोभा काळे, कांता कोळपे, अलका टोके, सारिका सरगर, रुक्मिणी काळे, कमल काळे, नकुसाबाई काळे, सखुबाई काळे, बायना काळे, इंदुबाई काळे, नर्मदा कोळे, वैजंता कोळेकर, रचना काळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात बनपुरीतील महिलांनी आटपाडीतील उपोषणस्थळी गर्दी केली होती.








