सांगली / विनायक जाधव :
गेल्या तीन ते चार महिन्यापासून सलग बंदोबस्तात असणाऱ्या पोलीसांनी आता सुटकेचा निःश्वास टाकला आहे. आता दहा-पंधरा दिवसाचा बंदोबस्ताचा ब्रेक मिळाला की, पुन्हा एकदा नवरात्र आणि दिवाळीचा बंदोबस्त सुरू होणार आहे. याशिवाय निवडणुकांचाही मोसम सुरू होत आहे. त्यामुळे जवळपास मार्च महिन्याअखेर पोलिसांना पुन्हा बंदोबस्त लावावा लागणार आहे. यामुळे हे दहा ते पंधरा दिवस पोलीसांसाठी सुटकेचा नि:श्वास सोडणारे ठरणार आहे.
पंढरीच्या वारीपासून म्हणजेच जून महिन्यापासून सांगली पोलीस दलातील पोलीस हे बंदोबस्तात होते. पंढरीच्या वारीसाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा जवळपास २० दिवस पाठविण्यात आला होता. यानंतर लगेचच सणासुदीचा बंदोबस्त सुरू करण्यात आला. त्यामध्ये श्रावण सोमवार, शिराळा नागपंचमी असे मोठे बंदोबस्त होते. त्यातच महापूराची लक्षणे दिसून आल्याने पोलीसांना नदीकाठी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते.
हा बंदोबस्त संपत नाही तोपर्यंत गणेशोत्सवाचा प्रारंभ झाला. जवळपास पंधरा दिवस या बंदोबस्त पोलीस अडकून पडले होते. यामुळे गेल्या तीन ते चार महिन्यापासून हे पोलीस बंदोबस्तातच मग्न दिसून येत होते. या पोलीसांना थोडीसुध्दा उसंत मिळाली नव्हती. आता हे दहा ते पंधरा दिवस त्यांना उसंत मिळणार आहे.
- सांगली जिल्हयात गणेशोत्सवानिमित्त चोख बंदोबस्त
सांगली जिल्हयात सध्याच्या स्थितीत कोणत्याही प्रकारे वातावरण चिघळू नये यासाठी पोलीसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला होता. त्यामध्ये प्रत्येक चौका-चौकात पोलीस दिसला पाहिजे अशा दृष्टीने पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यामुळे कोठेही दंगा-धोपा झाला नाही. याशिवाय गणेशोत्सवात मंडळाच्या कार्यकर्त्यांच्यात होणारी स्पर्धाही झाली नाही. कारण थोडे जरी कोठे आवाज आला तर पोलीस तात्काळ त्याठिकाणी पोहचत होते. पोलीसांकडून मोठ्या प्रमाणात दक्षता घेण्यात आली होती. यामुळे सांगली शहरात पाचव्या, सातव्या, नवव्या आणि अनंत चतुदर्शीच्या मिरवणुका अत्यंत चांगल्या पध्दतीने झाल्या यामध्ये कोणताही गोंधळ, दंगा-धोपा झाला नाही.
- मिरजेत अनंत चतुदर्शीचा बंदोबस्त खडा पहाऱ्यासारखा
मिरजेत सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या एकाच दिवशी म्हणजे अनंत चतुदर्शीला विसर्जन मिरवणुका काढल्या जातात. त्यामुळे या मिरवणुकीवेळी मोठ्या प्रमाणत धुसफूस होण्याची शक्यता असते. तसेच मिरवणुकीचा मार्गही एकच असल्याने याठिकाणी कोणाला धक्का लागू शकतो. त्यातून वादावादी होवू शकते. याकारणाने याठिकाणी पोलीसांचा खडा बंदोबस्त गरजेचा असतो. तसेच सांगली जिल्हयासह सीमा भागातून मोठ्या प्रमाणात भाविकही मिरवणुक पाहण्यासाठी येतात. तसेच मुख्य चौकात या मिरवणुकीचे स्वागतही विविध पक्षातर्फे तसेच महापालिका आणि पोलीसांच्यावतीने करण्यात येते. याठिकाणीही मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते.
तसेच प्रत्येक मंडळांकडून याठिकाणी आपल्या मिरवणुकीतील महत्वाचे वाद्य किंवा पारंपारिक नृत्य दाखवण्याची संधी मंडळे घेतात. त्यामुळे या चौकात मोठया प्रमाणात गर्दी असते. तसेच धक्काबुक्की लागण्याची शक्यता असते. यामुळे ठिणगी पडून हा वाद वाढू शकतो. त्यामुळे या चौकात पोलीसांचे मोठे कडे करावे लागते.
ही मिरवणुक पोलीसांच्याकडून शांततेत पार पडली गेली आहे. ही मिरवणुक पार पाडणे हेच पोलीसांच्यासमोर मोठे आव्हान असते आणि ते आव्हान आता पेलण्यात आले आहे.
- सीसीटीव्हीची मदत
पोलीसांनी यावेळी गणेशोत्सवानिमित्त मोठया प्रमाणात सीसीटीव्हीचा उपयोग केला होता. ज्याठिकाणी जादा गर्दी झाली आहे. त्याठिकाणी तात्काळ पोलीस पाठवण्यासाठी या सीसीटीव्हीची मदत झाली आहे. तसेच कोठेही गैरकृत्य दिसत असेल तर त्याठिकाणी तात्काळ पोलीस पाठवण्याची सोय करण्यात आली होती. यामुळे पोलिस तात्काळ येत असल्याने वादावादी करणारे लगेचच बाजूला होत होते.
- चोख नियोजन आणि चोख बंदोबस्त
पोलीसांनी यावेळी मिरवणुक मार्गावर इतर कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला नाही. तसेच ज्या मार्गावर भाविकांची गर्दी आहे, त्या मार्गावर चारचाकीपासून अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली होती. त्यामुळे वाहनांची वर्दळ पूर्ण थांबल्याने पोलीसांना बंदोबस्त करताना कोणताही अडचण आली नाही.
या चोख नियोजनामुळे पोलीसांनाही दंगेखोरांच्याकडे बारकाईने लक्ष ठेवण्यात यश आले आहे. यासाठी पोलीसांनी मिरवणुकाच्या आधीपासूनच रस्ते कोणकोणते बंद राहणार आहेत. तसेच कोणत्या रस्त्याला समांतर वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्यात आला आहे. याची माहिती दिली होती. यामुळे वाहनधारकांचीही गैरसोय झाली नाही.








