कोल्हापूर :
कळंबा (ता. करवीर) येथील गर्भलिंग निदान गुन्ह्यात आणखी दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. छाप्या दरम्यान, पोलिसांना चकवा देऊन फरारी झालेल्या सोनोग्राफी मशीनचालक सुयश सुनील हुक्केरी (वय 30, रा. फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) याला पोलिसांनी शुक्रवारी राहत्या घरातून अटक केली होती. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, पोलिसांकडे आणखी दोन साथिदारांची नावे निष्पन्न झाली असून तपास सुरु आहे.
त्या दोघांच्याही शोधासाठी पोलिसांनी छापेमारी सुरू केली असून लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. तसेच गुन्ह्यात वापरेलेले सोनोग्राफी मशिन कर्नाटकातून आणले असल्याची माहितीही तपासातून समोर आली आहे. सोनोग्राफी मशिनच्या शोधासाठी करवीर पोलिसांचे एक पथक शनिवार 22 रोजी कर्नाटकला रवाना झाले. त्यामुळे या गर्भलिंग गुन्ह्यातील संबंध कर्नाटकशी असल्याचे स्पष्ट होत आहे.
मागील आठवड्यात आरोग्य विभागाने पोलिसांच्या मदतीने कळंबा येथील साई मंदिर परिसरातील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये स्टिंग ऑपरेशनने छापा टाकून अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी मशीन घेऊन आलेला एजंट सुयश हुक्केरी पोलीस कारवाईची चाहूल लागताच पोलिसांना चकवा देऊन मशीनसह पसार झाला होता. तेंव्हापासून तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. आता तो पोलिसांच्या हाती लागल्याने तपासाला गती येत आहे. त्याच्याकडील सोनोग्राफी मशीन अद्याप मिळालेले नाही. त्याने ते कर्नाटकातील पुरवठादारास परत दिले असण्याची शक्यता असल्याने पोलिसांचा त्या दृष्टीने तपास सुरू आहे. या गुन्ह्यातील डॉ. दीपाली ताईगडे हिच्यासह गर्भपाताच्या गोळ्या पुरवणाऱ्या दोन महिलांना यापुर्वीच अटक केली आहे.
- गर्भलिंग निदान गुन्ह्याचा कर्नाटकशी संबंध
जिह्यात यापुर्वी घडलेल्या बहुतांश गुन्ह्यातील सोनोग्राफी मशीन कर्नाटकातून आणल्याचे तेंव्हाच पोलीस तपासातून स्पष्ट झाले. कळंबा येथील गुन्ह्यात कर्नाटकातून सोनोग्राफी मशीन आणल्याची कबुली सुयश हुक्केरी याने पोलिसांकडे दिली आहे. त्यामुळे गर्भलिंग निदान गुन्ह्यात कर्नाटकातील टोळीशी संबंध उघड होत असून त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
- गोळ्यांचा पुरवठा करणारे मोकाटच
आरोग्य विभाग व पोलिसांनी छापा टाकून कळंबा व वरणगे पाडळी येथील गर्भलिंग निदान गुन्हाप्रकरणी महिला डॉक्टरला अटक झाली होती. डॉ. दीपाली ताईगडे हिच्या रुग्णालयात कोणी गोळ्या पोहोचवल्या? कोणी मागवल्या? गोळ्यांचा पुरवठादार कोण आहे? याची चौकशी अजून झालेली नाही. त्यामुळे या गुह्यातील अनेक संशयित आरोपी अजूनही मोकाट आहेत.








