समर्थन संघटनेकडून पोलिसांचा होणार सत्कार : दोघाही संशयितांना पाच दिवस पोलीस कोठडी

म्हापसा : सडये -शिवोली येथे शनिवारी रात्री छत्तीसगडच्या तऊणांनी राजेंद्र मोरजकर यांच्या दुभत्या गायीची शेतात कोयत्याने वार करून हत्या केली होती. त्या गायीच्या वासराना मारेकऱ्यांनी हत्येसाठी शेताच्या अडगळीत बांधून ठेवले होते. म्हापसा पोलिसांनी वासराला सोडून जीवदान दिले. यावेळी म्हापसा उपअधीक्षक जिवबा दळवी, सडये शिवोली सरपंच दीपा पेडणेकर व ग्रामस्थांकडून वासराला खाण्यासाठी चारा देण्यात आला होता. गोहत्या करणाऱ्या दोघांही संशयितांना रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शेळ-सडये येथे राजेंद्र मोरजकर यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहाणाऱ्या आतानास लकडा तसेच मनबहल एक्का यांनी शनिवारी रात्री मोरजकर यांच्या दुभत्या गायीची जवळच्या शेतात नेऊन कोयत्याने हत्या केली. व गायीचे एक वासरू पळवून अडगळीत बांधून ठेवले होते. मृत गायीचे धड गोणपाटात घालून इतरत्र येत असतानाच रस्त्याशेजारच्या हॉटेल कम रिसॉर्टमधील कॅमेरात हा प्रकार कॅमराबद्ध झाला होता. या गोहत्या प्रकरणाची माहिती मिळताच रविवारी सकाळी सरपंच दीपा पेडणेकर यांनी यासंबंधात रितसर तक्रार पोलिसात दाखल केली होती. या संदर्भात म्हापसा पोलिसांना माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी दोघांही संशयित मारेकऱ्यांना ताब्यात घेतले होते. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सोमवारी सकाळी म्हापसा पोलिसांनी घटनास्थळाची पाहाणी केली असता शेताच्या दुसऱ्या कोपऱ्यात वासरू बांधून ठेवले असल्याचे दिसून आले. वासरू भुकेने व्याकूळ झाले होते. पोलिसांनी ते ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी या गोहत्या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावून संशयित आरोपींना गजाआड केल्याबद्दल शिवोलीतील समर्थन संघटनेचे निलेश वेर्णेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. मंगळवारी संध्याकाळी म्हापसा पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्याचे ठरविले आहे.









