आरोपीच्या चौकशीसाठी हरियाणा पोलिसांकडे साधला संपर्क
वृत्तसंस्था/चंदीगड
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली युट्यूबर ज्योती मल्होत्राचे प्रकरण आता अनेक राज्यांपर्यंत फैलावले आहे. ज्योतीच्या चौकशीकरता केंद्रीय तपास यंत्रणांसोबत 9 राज्यांच्या पोलिसांनी हरियाणा पोलिसांशी संपर्क साधला आहे. ज्योतीने ज्या राज्यांमध्ये जात तेथील व्हिडिओ इंटरनेटवर मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले, तेथील स्थानिक पोलीस आता तपास करत आहेत. दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि राजस्थान यासारख्या राज्यांच्या पोलिसांनी देखील याप्रकरणी ज्योतीची चौकशी करू देण्याची अनुमती मिळावी अशी मागणी केली आहे. ज्योती मल्होत्रा विरोधात अनेक गंभीर पैलूंची चौकशी केली जात आहे. तिचा मोबाइल फोन आणि लॅपटॉपचा फॉरेन्सिक अहवाल एक-दोन दिवसांत पोलिसांना प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. पुढील 4 दिवसांच्या कोठडीत याच अहवालांच्या आधारावर तिची चौकशी केली जाणार आहे. संवेदनशील ठिकाणांचे चित्रिकरण करत त्याचे व्हिडिओ ज्योतीने अपलोड केल्याचा पोलिसांना संशय आहे.
विदेशातीलही व्हिडिओ
ज्योतीने विदेशातही प्रवास केला होता, चीन, भूतान, नेपाळ, इंडोनेशिया, दुबई, बांगलादेश आणि थायलंड यासारख्या देशांमध्ये जात तयार करण्यात आलेले व्हिडिओ तिच्या अकौंटवर आहेत. यातील काही प्रवास खास उद्देशाने करण्यात आले हेते आणि या देशांच्या नागरिकांशी तिचे संशयास्पद संभाषणही झालेले असू शकते. तपासात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. सैन्य संघर्षावेळी ज्योती एका पीआयओ (पाकिस्तान इंटेलिजेन्स ऑपरेटिव्ह)च्या संपर्कात होती असा पोलिसांचा दावा आहे. परंतु याबद्दल अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
आणखी 4 दिवसांची कोठडी का?
दुसरीकडे ज्योतीचे पिता हरीश मल्होत्रा या पूर्ण प्रकरणामुळे दुखावले गेले आहेत. ज्योती विदेश प्रवास करत असल्याचे माहित नव्हते. ज्योति घरातून बाहेर पडल्यावर दिल्लीला जात असल्याचे सांगायची आणि 4-5 दिवसांनी परत यायची. चौकशीदरम्यान अनेक पोलीस घरी आले त्यांनी घराची झडती घेतली. तसेच ज्योतीचे दोन जुने मोबाइलही त्यांनी नेले आहेत. माझ्याकडे वकील नेमण्यासाठी पेसे नाहीत. याचमुळे सरकारकडून वकील मागितला आहे. पोलिसांना 5 दिवसांच्या कोठडीत काहीच मिळाले नाही मग आणखी चार दिवसांची कोठडी का घेण्यात आली, असा प्रश्न हरीश मल्होत्रा यांनी विचारला आहे.
कुठे-कुठे केला प्रवास?
ज्योतीने राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमा, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम, गुलमर्ग, श्रीनगर, दिल्लीतील विविध ऐतिहासिक स्थळे, उत्तरप्रदेशातील वाराणसी, अयोध्या, प्रयागराज आणि वृंदावन, ओडिशातील पुरी, बिहारमधील भागलपूर, पश्चिम बंगालमध्ये कोलकाता, अमृतसर येथील सुवर्ण मंदिर आणि अटारी बॉर्डर समवेत अनेक ठिकाणी जात व्हिडिओ तयार केले होते. या सर्व ठिकाणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या व्हिडिओंच्या माध्यमातून संवेदनशील माहिती शेअर करण्यात आल्याचा संशय आहे. याचमुळे संबंधित राज्यांचे पोलीस चौकशीत सामील झाले आहेत.









