प्रतिनिधी/ बेळगाव
गोव्याचे माजी आमदार लवू मामलेदार (वय 67) खून प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून मार्केट पोलिसांनी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयात शुक्रवारी 230 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. लवकरच या खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ होणार आहे. 15 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी क्षुल्लक कारणावरून खडेबाजार येथील श्रीनिवास लॉजसमोर लवू मामलेदार यांचा खून करण्यात आला होता. सुभाषनगर येथील अमिर सोहेल ऊर्फ मुजाहिद शकील सनदी (वय 27) या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे.
मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास पूर्ण केला आहे. सीसीटीव्ही फुटेजसह अनेक पुराव्यांचे वैज्ञानिक पृथ्थकरणही करण्यात आले आहे. एकूण 230 पानांचे आरोपपत्र तयार झाले असून शुक्रवार दि. 2 मे रोजी ते न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. तत्पूर्वी सरकारी वकिलांकडून त्याची छाननीही करण्यात आली आहे.
अमिरसोहेलने दहावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. 14 मार्च रोजी न्यायालयाने त्याला जामीन नाकारला आहे. मार्केट पोलिसांनी अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने या प्रकरणाचा तपास पूर्ण करून आरोपपत्र सादर केले आहे.









