प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयाला खंडणीसाठी फोन करून धमकावणाऱ्या जयेश पुजारीने हिंडलगा कारागृहात अद्यापही आपले कारनामे सुरूच ठेवले आहेत. गळा चिरल्याचे भासविण्यासाठी पांढऱ्या कपड्याची पट्टी बांधून घेण्यासह कारागृहात मासे आणल्याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी जयेश पुजारीसह अन्य एका कैद्याविरोधात बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवार दि. 24 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. हिंडलगा कारागृहाचे प्रभारी साहाय्यक अधीक्षक व्ही. कृष्णमूर्ती यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
सी. जे. हरीशबाबू, जगदीश्वर गुप्ता, कैदी नं. 4636 आणि जयेश ऊर्फ जयेशकांत पुजारी, कैदी नं. 689 अशी गुन्हा दाखल झालेल्या कैद्यांची नावे आहेत. हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यासाठी मासे पुरविले जात आहेत. सदर मासे कारागृह अधिकाऱ्यांना देण्यात येत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. त्याचबरोबर जयेशने आपला गळा चिरला असल्याचे भासविण्यासाठी गळ्यावर पांढऱ्या कपड्याची पट्टी बांधून घेऊन तो व्हिडिओही व्हायरल करण्यात आला. ही माहिती कारागृह प्रशासनाला समजल्याने दोन्ही व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलेले चित्रीकरण बनावट असून ते मिक्सिंग करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. तशाप्रकारची घटना कारागृहात घडली नसून कैदी सी. जे. हरीशबाबू आणि जयेश यांचे व्हिडिओ कोणीतरी तयार करून ते व्हायरल केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी फिर्याद देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ अधिक तपास करीत आहेत.









