बेळगाव : गौंडवाड येथील सतीश पाटील खून प्रकरणाच्या खटल्याचा निकाल शनिवारी देण्यात आल्याने खबरदारी म्हणून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रविवारीदेखील गावात पोलीस बंदोबस्त कायम असून कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. देवस्थान जमिनीच्या वादातून सतीश पाटील या तरुणाचा 2022 मध्ये जांबियाने भोसकून निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेनंतर गावात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त जमावाने वाहनांची जाळपोळ केली होती.
या प्रकरणी पोलिसांनी 25 जणांवर गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोप दाखल केला. त्यामुळे या खटल्याची सुनावणी द्वितीय अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती. सुनावणीवेळी 9 जणांवर आरोप निश्चित झाल्याने त्यांना न्यायालयाने 19 ऑगस्ट रोजी दोषी ठरविले होते. त्यानुसार शनिवारी 5 जणांना जन्मठेप तर चौघांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या काळात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, या दृष्टिकोनातून काकती पोलिसांकडून गावात पथसंचलन करून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याचबरोबर रविवारीही पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला होता. मारेकऱ्यांना न्यायालयाने योग्य शासन दिल्याने सतीश पाटील याच्या कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी न्यायदेवतेचे आभार मानले आहेत.
‘तरुण भारत’चे मानले आभार
सतीश पाटील खून खटल्याचे सविस्तर वृत्तांकन रविवारच्या अंकात ‘तरुण भारत’ने केले आहे. ज्या दिवशी सतीश पाटीलचा खून झाला होता, त्या दिवशीही ‘तरुण भारत’ने सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर शनिवारच्या निकालाचाही सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी ‘तरुण भारत’चे कौतुक करत आभार व्यक्त केले. रविवारच्या वृत्तांकनाबद्दल वाचकांनी ‘तरुण भारत’च्या कार्यालयाला फोनवरून आभार व्यक्त केले.









