कराड :
रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या गुन्हेगारी कृत्याचा सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत देशी बनावटीच्या पिस्तुलसह संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून देशी बनावटीची पिस्तुल, जिवंत काडतुसे, मोबाईल हँडसेट आणि मोटारसायकल असा एकूण २ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान अटकेतील संशयितांना पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयितांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
दरम्यान याप्रकरणात आणखी काही संशयितांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून त्यादृष्टीने सोमवारी कराड, ओगलेवाडी, सैदापूर या परिसरात पोलिसांनी छापासत्र राबवले.
सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या निर्देशानुसार, बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. ९ जून रोजी कराड शहर, कराड तालुका व मसूर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंध पेट्रोलिंग सुरू असताना पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार तन्वीर अली पटेल (रा. वाघेरी, ता. कराड) हा साथीदारांसह मोटारसायकलवरून गावठी पिस्टलची विक्री करण्यासाठी रस्त्याने जात आहे.
माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे व पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्या पथकाने नायरा पेट्रोल पंपाजवळ सापळा रचला. काही वेळातच तिघे जण मोटारसायकलवरून येताना दिसल्यावर त्यांना शिताफीने अटक करण्यात आली. तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून २ देशी बनावटीची पिस्टल, ५ जिवंत काडतुसे, १ मोकळी मॅगझीन, ३ मोबाईल हँडसेट व मोटारसायकल असा २ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हरतगत करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक कृष्णा डिसले यांनी संशयितांना कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सपोनि रोहित फार्णे, पोउनि परितोष दातीर, पो.कॉ. विश्वास शिंगाडे, अतीष घाडगे, विजय कांबळे, शरद बेबले, लेलैश फडतरे, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, अमित सपकाळ, अमित माने, अरुण पाटील यांनी कारवाई केली.








