आंदोलन सुरुच ठेवण्याचा सेविकांचा निर्धार
प्रतिनिधी /पणजी
येथील आझाद मैदानावर सेवेत परत घ्या या एकमेव मागणीसाठी गेल्या 25 दिवसांपासून धरणे धरून बसलेल्या सात अंगणवाडी सेविकांना पणजी पोलिसांनी अखेर 151 कलमाखाली अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता अंगणवाडी सेविकांनी मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे ठामपेणे न्यायालायत सांगितल्याने पोलासंनी पुढील कारवाई केली.
सुरुवातीला साखळी उपोषण करणाऱया सात अंगणवाडी सेविकांनी गेल्या दोन दिवसांपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. 18 जून रोजी क्रांती दिनाच्या कार्यक्रमात सरकारच सुडाचे राजकारण उघडय़ावर येऊ नये म्हणून सरकारने आमच्यावर कारवाई केली आहे. मात्र आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असून सेवेतून कमी केल्याचा आदेश जोपर्यंत सरकार मागे घेत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरुच रहाणार. आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केल्यास महिला आणि बालकल्याण खात्याच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असा निर्णय सेविकांनी घेतला आहे.
बेमुदत उपोषणाला बसलेल्या अंगणवाडी सेविकामध्ये देवयानी तामसे, ज्योती सावार्डेकर, ज्योती केरकर, विद्या नाईक, रश्मीता नाईक, कदेजा अट्टानीकर व पोर्णिमा गावकर यांचा समावेश आहे. सरकारने आम्हाला सेवेतून कमी करण्यापूर्वी आमची चुक काय ते तरी सांगावे. खात्यचे मंत्री विश्वजीत राणे यांना हेच विचारण्यासाठी कित्येकवेळा भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते भेटलेच नाही. आम्हाला सेवेतून कमी करण्याचे किमान कारण तरी सांगावे असेही त्यांनी सांगितले.
महिला आणि बाल कल्याण खात्याने आम्हाला कोणतीही आगावू सुचना न देता किंवा कारणे दाखवा नोटीसही न देता आम्हाला सेवेतून कमी केले. केवळ आमच्या रास्त मागण्यासाठी आंदोलन करेणे ही आमची चुक आहे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आंदोलन करताना दिडहजारहुन अधिक अंगणवाडी सेविका होत्या. त्यावेळी आम्हाला आंदोलनात अनेक राजकीय पक्षांनी सहकार्य केले होते. आम्ही कुणालाही आमंत्रण दिले नव्हते किंवा कुणाला विनंतीही केली नव्हती. आंदोलन झाले मागण्याही सरकारने मान्य केल्या आता आम्हालाच सेवेतून कमी का करण्यात आले असा प्रश्न अंगणवाडी सेविकांनी उपस्थित केला.








