कोणताही गैरप्रकार आढळून आला नाही
प्रतिनिधी/ बेळगाव
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात शनिवारी सकाळी छापा टाकून पोलिसांनी तपासणी केली. या तपासणीत काहीच आढळून आले नाही. त्यामुळे छाप्यानंतर अधिकारी रिकामी हाताने तेथून परतले आहेत.
गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राजे अरस, गुन्हे तपास विभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कारागृहावर अचानक छापा टाकण्यात आला. प्रत्येक बराकीला भेट देऊन तपासणी करण्यात आली.
कारागृहातील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस दलाकडून अधूनमधून कारागृहात तपासणी मोहीम राबविण्यात येते. शनिवारी सकाळी सीसीबीचे पोलीस निरीक्षक नंदीश्वर कुंभार, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक उस्मान आवटी यांच्यासह चार पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी उपस्थित होते. राखीव दलाच्या जवानांचीही मदत घेण्यात आली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीसाठी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातून धमकीचा फोन गेल्यानंतर कारागृह ठळक चर्चेत आले आहे. त्यानंतर अनेकवेळा पोलिसांनी छापे टाकून तपासणी केली आहे. यापूर्वी अमलीपदार्थ, शस्त्रs आढळून आली आहेत. शनिवारच्या कारवाईत मात्र काहीच मिळाले नाही. यासंबंधी कारागृह अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तपासणी झाली आहे. मात्र, काहीच हाती लागलेले नसल्याचे त्यांनी सांगितले.








