काँग्रेसकडून पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
पणजी : ईमेजिन पणजी स्मार्ट राजधानी सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड (आयपीएससीडीएल) या सार्वजनिक कंपनीद्वारे पणजीत चाललेल्या स्मार्ट सिटी कामांमुळे सर्वसामान्य जनतेचे जीवन धोक्यात आले आहे, अशी तक्रार काँग्रेस पक्षातर्फे पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसचे एल्वीस गोम्स, जॉन नाझारेथ आणि इतरांनी दाखल केलेल्या या तक्रारीत, स्मार्ट सिटी आणि अमृत मिशनच्या माध्यमातून सध्या राजधानीत अनेक विकासकामे सुरू आहेत. सार्वजनिक निधीचा वापर करून प्रकल्पांचे व्यवस्थापन, नियोजन, मूल्यमापन, अंमलबजावणी, संचालन, देखभाल करण्याचे काम या कंपनीकडे आहे. परंतु या कामांमुळे ’सार्वजनिक जीवन आणि वैयक्तिक सुरक्षेला धोका’ पोहोचला असल्याचे म्हटले आहे. सदर प्रकार हा भारतीय दंड संहितेंतर्गत दंडनीय अपराध आहे. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दर्जाबद्दल मंत्रीच साशंक
सदर कामे आणि त्यांच्या दर्जाबद्दल बोलताना साबांखा मंत्र्यांनी राजधानीत यंदा पूर येणार नाही, असे आपण ठामपणे सांगू शकत नसल्याचे म्हटले होते. त्यांचे हे विधान सर्वश्रूत असून त्यातून सदर दोन्ही एजन्सींमध्ये समन्वय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वत: मंत्रीच असे बोलल्यामुळे आता लोकांच्या मनात खास करून अतिवृष्टीच्या वेळी स्वत:चा जीव आणि मालमत्तेच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.
जनतेला होतोय प्रचंड त्रास
आयपीएससीडीएलकडून प्राप्त माहितीनुसार सध्या सुमारे 49 कामे एकतर पूर्ण झाली आहेत, प्रगतीपथावर आहेत किंवा सुरू नाहीत, असे समजले आहे. या कामांसाठी तब्बल 1100 कोटी पेक्षा जास्त खर्च आला आहे. परंतु त्यादरम्यान विनानियोजन अंमलबजावणी करण्याच्या पद्धतीमुळे एकतर रस्ते दीर्घकाळ बंद राहिले, सततच्या धुळीमुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले, व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
पावसाळ्यात बिघडणार परिस्थिती
नुकसानीची ही मालिका एवढ्यावरच न थांबता आता येत्या पावसाळ्dयात पूरस्थिती उद्भवल्यास लोकांचे जीवन एकदमच धोक्यात येऊ शकते आणि सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. त्रासांबरोबरच रोगराईही पसरु शकते, असेही तक्रारीतून निदर्शनास आणण्यात आले आहे. अशावेळी जीवन सुरक्षेशी संबंधित कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी या पत्राची दखल घेऊन जबाबदारी निश्चित करण्यात यावी, तसेच गरज पडल्यास त्वरित फौजदारी कारवाई करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.









