ऑडिओची सखोल चौकशीची : सुदीप ताम्हणकर यांची मागणी
फोंडा : जॉबस्कॅम प्रकरणाच्या गोंधळात सध्या सत्ताधारी पक्षातील एका आमदारांचा शिरकाव असल्याचा एक ऑडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याला अनुसरून सामाजिक कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी कुळे पोलीस स्थानक, फोंडा पोलीस उपअधीक्षक शिवराम वायंगणकर व दक्षिण गोवा अधीक्षक सुनिता सावंत यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. यासंबंधी कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ताम्हणकर यांनी केली आहे. जॉबस्कॅम प्रकरणातील काही वर्षापूर्वीचा एक ऑडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. या ऑडिओत एका भाजपाच्या आमदाराचा आवाज असल्याचे सुदीप ताम्हणकर यांचे म्हणणे आहे. आमदाराने आपल्या पीएच्या मध्यस्थीने एका कार्यकर्त्याला सहाव्या श्रेणीतील अधिकारी पदाखाली सुमारे 7 लाख रुपयांचा सौदा केला होता. त्यापैकी केवळ 1 लाख रुपये आगाऊ घेतला होते. त्या कार्यकर्त्याने सरकारी नोकरी घेतल्यानंतर सर्व कुटूंबियांनी निवडणूक काळात आपल्या विरोधात प्रचार केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे. आपण निवडणूक काळात कोट्यावधी रुपये खर्च करावे आणि सरकारी नोकरी मिळवून तुम्ही मजा मारावी असा प्रतिप्रश्न त्याला आमदाराने केला आहे. सौद्यानुसार उर्वरित रक्कमही परत देण्याविषयी बहाणे नको, ताबडतोब उर्वरित रक्कम आपल्या स्वीय सचिवाकडे देय करावी, अशी मागणी आमदाराने ऑडिओतून केलेली आहे.
ऑडिओची सत्यता तपासण्याची पोलिसांपुढे आव्हान
सोशल मीडियावर चर्चेतील हा ऑडिओतील आवाज कुणाचा ? खुद्द त्या कार्यकर्त्यानेच रेकॉर्डिंग सोशल मीडियावर केल्याशिवाय तो चर्चेत कसा आला ? ऑडिओ सत्यता तपासण्याचे मोठे आव्हान दक्षिण गोवा अधीक्षक सुनिता सावंत यांच्याकडे आहे. याप्रकरणी फोंडा येथील प्रसारमाध्यमांशी बोलताना सुदीप ताम्हणकर म्हणाले की, जॉबस्कॅम प्रकरणाची झळ सत्ताधारी पक्षाच्या आमदार, मंत्र्यांपर्यंत पोहचलेली आहे. नोकरीसाठी पात्र एखादा उच्चशिक्षित उमेदवाराची शैक्षणिक पात्रता डावलून पैशानी सरकारी नोकरी विकत घेण्याचे प्रकार सर्रास सत्ताधारी पक्षातर्फे करण्यात येत असल्याचे या कृतीतून सिद्ध होत आहे. पैसे घेणाऱ्या एवढेच पैसे देणारेही तेवढेच जबाबदार आहे. त्यामुळे त्याच्यावरही गुन्हा नोंद होणे गरजेचे आहे. आजपर्यत पैसे देणाऱ्यावर एकही गुन्हा नोंद का झालेला नाही ? असा सवाल सुदीप ताम्हणकर यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री ज्याप्रमाणे आपण जॉब स्कॅम घोटाळ्यातील संशयितांची मालमत्ता विकून पैसे वसुली करण्याचे आ़श्वासन देतात. तसे न झाल्यास भाजप फंडातून पैसे देणारहेही मुख्यमंत्र्यानी आधी स्पष्ट करावे.









