सरकारी विभाग असो की एखादी खाजगी संस्था तुमच्या अंगात नेतृत्वगुण असतील तर तो विभाग अथवा संस्था सातत्याने प्रगतीपथावर असते. अशाच प्रकारे राज्यातील मुंबई पोलीस दल सध्या यशाच्या शिखरावर आहे. कारण याचे नेतृत्व करीत आहेत विवेक फणसाळकर. पोलीस आयुक्तांच्या विवेकी पोलिसिंगमुळे सामान्य मुंबईकर तर सुरक्षित आहेच मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली कर्तव्य बजाविणारे पोलीस दलदेखील उत्साहित आहे.
सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलीस दलाचे ब्रिदवाक्य आहे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नाश.. असा याचा अर्थ होतो. त्याप्रकारे मुंबई पोलीस दल वर्षानुवर्षे आपले कर्तव्य बजावित आहेत. मुंबई पोलीस दलाची ख्याती अख्या जगात दुमदुमत असते. दहशतवादी हल्ला असो की अतिशय क्लिष्ट गुन्हा असो, तो मुंबई पोलीस दलाने चुटकीसारखा सोडविल्याचा इतिहास आहे. आज मुंबई पोलीस दलाच्या कर्तव्यनिष्ठतेमुळेच सामान्य मुंबईकर सुखाची झोप घेत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेले हे मुंबई शहर जगातील व्यावसायिक, मनोरंजन, शैक्षणिक धरोधर असलेले शहर म्हणून ओळखले जाते.
संपूर्ण जगाचा संबंध मुंबई शहराशी येनकेन प्रकरणाने येत असतो. देशातील अनेक प्रांतातूनच नाही तर जगातील अनेक देशातून अतिशय उत्कंठेपोटी नागरिक मुंबई शहरात येत असतात. काही उद्योगधंद्यांच्या निमित्ताने येत असतात. तर काही पर्यटक म्हणून तर काही पोट भरण्यासाठी येत असतात. या सर्वांना मुंबई सामावून घेत असते. तर दुसरीकडे या सर्वांची सुरक्षा करण्याचे काम मुंबई पोलीस दल करीत आहे. ते ही अतिशय शांत, संयम आणि विवेकपणे. कारण पोलीस दलांचे नेतृत्वच अगदी विवेकी असल्याने मुंबईकर त्यांच्या पंखाखाली अगदी सुरक्षित आहेत. ते पोलीस आयुक्त म्हणजेच विवेक फणसाळकर होय.
पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे अतिशय हुश्शार, शांत संयमी आणि नावाप्रमाणेच विवेक आहेत. जागतिक दर्जाचे शहर अशी ख्याती असलेले मुंबई शहर हे सातत्याने येनकेन प्रकरणाने प्रतिदिन कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असते. मग ते राजकीय हालचाली असो की पोलीस कारवाई असो. दहशतवाद्यांच्या निशाण्यावर तर ते सातत्याने असल्याचा इतिहास आहे. मग त्यावेळी म्हणजे 1993 साली झालेले साखळी बॉम्बस्फोट असो की 2006 साली झालेले लोकलमधील साखळी बॉम्बस्फोट असो की जगाला हादऊन सोडणारा 26/11 चा हल्ला असो. मुंबई शहराला टार्गेट करणे म्हणजे संपूर्ण देशावर निशाणा साधल्यासारखे असल्याचे दहशतवाद्यांनादेखील कळून चुकले आहे.
यामुळे अशा सातत्याने लाईमलाईटमध्ये असलेल्या शहराची चारही बाजूने सुरक्षा करणे म्हणजे मोठे अग्निदिव्य असते. मात्र हे शिवधनुष्य मोठ्या हिकमतीने पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी पेलले आहे. चोवीस तास सतर्क असलेल्या पोलीस आयुक्तांनी ज्यावेळेस पोलीस आयुक्त म्हणून पदभार सांभाळल्याचे सहा महिनेदेखील झाले नव्हते. अशातच मुंबई शहरात महाविकास आघाडीने म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या नेतृत्वाखाली महामोर्चाचे आयोजन केले होते. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षानेदेखील माफी मांगो आंदोलन छेडले होते.
एकीकडे विरोधी पक्षांचा महामोर्चा आणि दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे माफी मांगो आंदोलन. शहरांत सुरक्षेचा मोठा पेच निर्माण होणार होता. अशातच पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या मुलीचे ज्यादिवशी हा मोर्चा आणि आंदोलन होणार होते, त्याचदिवशी लग्न होते. मात्र यावेळी मुंबईकरांची सुरक्षा आणि आपले कर्तव्य बजाविण्यासाठी वर्दीत असलेल्या बापाने काळजावर दगड ठेवत मुलीच्या डोक्यावर अक्षता टाकायच्या सोडून स्वत: रस्त्यावर उभे राहीले. आधी वर्दीचे कर्तव्य मग कुंटुंबाचे कर्तव्य. फणसाळकर यांच्या कर्तव्यनिष्ठेने अख्खा मुंबईकरच नाही तर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनादेखील गदगदून आले. तळहाताच्या फोडासारखे जपलेल्या मुलीच्या लग्नातदेखील हजर न राहता एक बाप रस्त्यावर उभे राहून कर्तव्य करीत असल्याचे पाहून अशा बापाला सर्वांनी मनापासून सलाम केला होता. पोलीस आयुक्तांचे अशा प्रकारे विवेकी पोलिसिंग पाहुन त्यांच्या नेतृत्वाखाली कर्तव्य बजावित असलेले अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी-कर्मचारीदेखील अनेकदा भारावून जात असतात. त्यांच्या दरबारात सामान्य मुंबईकर ते सामान्य पोलीस कर्मचारीदेखील तक्रार घेऊन आला तर तो कधीही खाली हाताने परत गेला नाही. एवढेच नाही तर मुंबई सुरक्षित रहावी यासाठी पोलीस दलाने अत्याधुनिक होण्याकडे त्यांचा कल आहे. सातत्याने हिटलिस्टवर असलेल्या मुंबईवर दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट होणार असल्याच्या धमक्या पोलीस नियंत्रण कक्षाला येत असतात. यावर्षात म्हणजे 2023 च्या पहिल्या सात महिन्यातच 32 धमकीचे फोन आले आहेत. तर 2022 साली ही आकडेवारी 15 तर 2021 साली 18 एवढी होती. मात्र अशा धमक्याना भिक न घालता, पोलीस आयुक्तांनी अगदी विवेकपणे हे कृत्य करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या वर्षात त्यांनी अशा प्रकारे धमक्या देणाऱ्या 17 जणांना अटक केली आहे. तर 15 प्रकरणांचा युद्धपातळीवर तपास सुऊ आहे. यादरम्यान, शहरात कोणत्याही अफवेमुळे मुंबईकर असुरक्षित असल्याची भावना बाळगू नये याकरीता पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाणे, तसेच इतर विभागांना सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले आहेत. माझा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे माझे कुटुंब असल्याची भावना पोलीस आयुक्तांची आहे. याकरीता 10 वी, 12 वी मध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांनी चांगले यश मिळविले आहे. त्यांचा सत्कार करीत त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम पोलीस आयुक्तांनी सातत्याने केले आहे.
एवढेच नाही तर मुंबईत सध्या सायबर गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. त्याचबरोबर पांढरपेशी गुन्हेगारीदेखील वाढत असल्याचे आढळून येताच, यांच्या योग्यवेळी नांग्या ठेचण्याचे काम त्यांनी केले. पोलिस दलातील सर्व पोलीस ठाणे, इतर विभागांचा ते वेळोवेळी आढावा घेत मुंबईकर कसा सुरक्षित राहील याची ते काळजी घेत असल्याने, मुंबईकरदेखील त्यांच्या विवेकी पोलिसिंगमुळे खुश आहे. तर असे पोलीस आयुक्त आम्हाला लाभले ही भावना संपूर्ण पोलीस दलाची आहे.
– अमोल राऊत








