टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय
बेळगाव : बालविवाह रोखण्यासाठी पोलीस दलाने गंभीर पावले उचलली आहेत. यासंबंधी निष्काळजीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर यासाठीच्या प्रयत्नांना वेग आला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सर्व पोलीस स्थानकांना पत्रे पाठविली असून बालविवाह रोखण्यासाठी कशा पद्धतीने कार्य करावे, यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे अधिकारी व पोलिसांनी पालन करावे, असे त्यांना सांगण्यात आले आहे. दि. 19 जुलै रोजी संपूर्ण राज्यात बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलांचा शोध घेण्याबरोबरच बालविवाह रोखण्यासंबंधी टास्क फोर्सची बैठक झाली आहे.
या बैठकीत टास्क फोर्सची जबाबदारी काय आहे, याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीनंतर 26 जुलै रोजी पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व अधिकाऱ्यांना कारवाईसंबंधी पत्रे पाठविली आहेत. बालविवाह होत आहे, अशी माहिती मिळताच संबंधित इतर खात्यांशी संपर्क साधून समन्वयाने त्यांच्याकडून फिर्याद दाखल करून घ्यावी व त्वरित एफआयआर दाखल करावेत. जर अल्पवयीनांचा साखरपुडा झाल्याची किंवा होत असल्याची माहिती मिळाली तरी बालविवाहासाठी मदत करणाऱ्यांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 कलम 10 व 11 अन्वये एफआयआर दाखल करावेत, अशी सूचना पोलीस आयुक्तांनी केली आहे. बालविवाहासंबंधी एखादी व्यक्ती तक्रार देण्यासाठी पोलीस स्थानकात पोहोचल्यास त्वरित त्या तक्रारीची खातरजमा करून घेऊन एफआयआर दाखल करावेत. याकामी विलंब किंवा निष्काळजीपणा करू नये. जर अधिकारी व पोलिसांचा निष्काळजीपणा आढळून आल्यास त्या अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.
आता काटेकोरपणे काळजी घ्यावी लागणार…
बालविवाह रोखण्यासाठी प्रत्येक पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील कल्याण मंटपांचे मालक, व्यवस्थापक, देवस्थान, मशीद, चर्च यांचे व्यवस्थापन मंडळ, लग्नासाठी येणारा मुलगा व मुलीच्या वयाची खात्री करून घेण्यासाठी आवश्यक शैक्षणिक दाखले, जन्म दाखला व दहावीचे प्रमाणपत्र पडताळून पाहण्यासंबंधी त्यांना नोटीस देण्याची सूचनाही पोलीस आयुक्तांनी केली आहे. त्यामुळे मंगल कार्यालये व धार्मिकस्थळांच्या व्यवस्थापकांनाही आता काटेकोरपणे काळजी घ्यावी लागणार आहे.









