वार्ताहर/कडोली
गुरुवार दि. 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ऐतिहासिक दसरा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सोमवारी कडोलीला भेट देऊन यात्रेसंदर्भात माहिती घेतली. कर्नाटकात म्हैसूर येथील दसरोत्सवाच्या पाठोपाठ कडोली गावचा दसरोत्सव तितक्याच मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या दसरोत्सवात भाग घेण्यासाठी कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र राज्यातून मोठ्या संख्येने भाविक येतात. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस खात्याने कंबर कसली आहे. काकती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे कडोलीत तळ ठोकून आहेत. यात्रेत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरे बसविले जाणार आहेत. भाविकांना कोणताही त्रास होवू नये यासाठी मिरवणुकीसाठी काही मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. दसरोत्सव तयारी संदर्भात पाहणी करण्यासाठी पोलीस आयुक्त बोरसे यांनी श्री कलमेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले आणि यात्रेसंदर्भात ग्रा. पं. आणि देवस्थान पंच कमिटीकडून माहिती घेतली. यावेळी पोलीस आयुक्तांचा पुष्पहार, श्रीफळ, शाल देऊन सत्कार करण्यात आला.
वाहतूक मार्गात बदल
येथील दसरोत्सवावेळी गुरुवारी मोठी गर्दी होणार असून मिरवणुकीमुळे प्रमुख मार्ग चक्काजाम होणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडणार आहे. यासाठी कडोली गावातून होणारी केदनूर, मण्णीकेरी, कट्टणभावी, बंबरगा, देवगिरी या गावची बससेवा, खासगी वाहतूक दुपारी 12 ते 6 वाजेपर्यंत व्हाया काकती होनगा मार्गे सुरू ठेवली जाणार आहे तर कडोलीची वाहतूक सेवा गावच्या वेशीपर्यंत सुरू ठेवली जाणार आहे. यावेळी माजी जि. पं. सदस्य उदय सिद्दण्णावर, ग्रा. पं. अध्यक्ष सागर पाटील, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष धनंजय कटांबळे, ग्रा. पं. सदस्य, देवस्थान पंच उपस्थित होते.









