वृत्तसंस्था/ वायनाड
केरळच्या वायनाड जिल्ह्यातील वनक्षेत्रात मंगळवारी रात्री उशिरा केरळ पोलीस विभागाच्या कमांडो पथकाचा माओवाद्यांशी सामना झाला. या कारवाईदरम्यान कमांडो पथकाने दोन माओवाद्यांना अटक केली आहे. केरळ पोलीस विभागाचे विशेष पथक आणि माओवाद्यांदरम्यान थलप्पुझा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील पेरिया भागात चकमक झाली. अटक करण्यात आलेल्या दोन माओवाद्यांमध्ये एका महिलेचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
माओवाद्यांचा एक समूह स्वत:चे मोबाइल फोन चार्ज करण्यासाठी एका घरात जाण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली आहे. चकमकीदरम्यान तीन माओवादी पसार झाले. तर अटक करण्यात आलेल्या माओवाद्यांना नजीकच्या पोलीस स्थानकात नेण्यात आले आहे. केरळ पोलिसांनी कोझिकोड येथे अटक करण्यात आलेल्या एका माओवादी समर्थकाच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पेरिया भागात शोधमोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत राज्य पोलीस विभागाचे कमांडो पथक, विशेष अभियान समूह (एसओजी) आणि थंडरबोल्ट स्वाक्डचा सहभाग होता.









