कराड / सुभाष देशमुखे :
कराड उपविभागात यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाची धामधूम पूर्वपिक्षा अधिक जोमात दिसत आहे. उपविभागात एकूण १४८१ सार्वजनिक मंडळे स्थापन झाली असून वाढत्या मंडळांवर नियंत्रण ठेवत उत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने पारंपरिक चौकटीबाहेरचा एक नवा प्रयोग राबवला आहे. प्रत्येक मंडळाला पोलीस अधिकारी ‘दत्तक पालक’ म्हणून नेमण्यात आला असून ते अधिकारी दररोज मंडळांना भेट देऊन संवाद साधत आहेत. पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. केवळ कायद्याचे पालन करून घेणे नव्हे तर मंडळांना समाजोपयोगी उपक्रमाकडे वळवणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दीष्ट दिसते.
कराड शहरासह उपविभागात अनेक सार्वजनिक मंडळांकडून जीवंत देखाव्यांवर भर दिला जातो. यातून प्रबोधनात्मक देखावे साजरे केले जातात. यंदा गणेशोत्सवाचा उत्साह आणखी वाढलेला दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या संपर्कात रहात त्यांना पर्यावरणपूरक मिरवणुका आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्सव साजरा करण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न पोलिसांचा आहे. यातून गणेशोत्सवाचा आनंदही टिकतो आणि समाजहिताचे संदेशही व्यापक पातळीवर पोहोचतात, असे मत पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी व्यक्त केले.
- प्रत्येक मंडळावर नजर व आधार
दत्तक पालक उपक्रमाचा दररोजचा अहवाल पोलीस उपअधीक्षक स्वतःकडे घेऊन त्यावर आणखी काही सूचना अधिकाऱ्यांना करत आहेत. त्यासाठी त्यांनी विशेष वेळ राखीव ठेवली आहे. कराड शहरात पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार तर ग्रामीण भागात पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे, अशोक भापकर, किरण भोसले, अनिल तारू, दीपक वागवे यासह अनेक महिला पोलीस अधिकारी मंडळांना नियमित भेटी देतात. या भेटींचा अहवाल सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांच्या माध्यमातून दररोज उपअधीक्षक पाटील यांच्याकडे पाठवला जातो.
- आव्हाने अजूनही कायम
पोलिसांची ही ‘दत्तक पालक’ संकल्पना स्वागतार्ह असली तरी परवानगी न घेणाऱ्या मंडळांची मोठी संख्या कमी करण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे. ध्वनीप्रदूषण, वाहतूक कोंडी आणि सुरक्षेचे प्रश्न हाताळताना पोलिसांवर मोठा ताण येणार हेही स्पष्ट आहे. मात्र पोलिसांनी मंडळांशी मैत्रीपूर्ण संवाद साधत त्यांना समाजप्रबोधनाच्या वाटेवर आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.
- पोलीस व गणेश मंडळ कार्यकर्त्यांची सकारात्मक भूमिका अधोरेखित
गणेशोत्सव हा फक्त धार्मिक उत्सव न राहता सामाजिक परिवर्तनाचे व्यासपीठ व्हावे. यासाठी पोलीस दत्तक पालक उपक्रम सर्व उपविभागात सुरू केला करण्यात आला आहे. यापूर्वी फक्त कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा उपक्रम राबवला जात होता. मात्र आता संपूर्ण विभागात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याचे अपडेट मी स्वतः घेत आहे. यामुळे मंडळाशी दररोजचा संपर्क होत असून या संकल्पनेतून पोलिसांचा मंडळांशी निगडीत संपर्क अधिक दृढ होत असून, समाजहिताच्या वाटचालीत पोलीस आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांची सकारात्मक भूमिका अधोरेखित होत असल्याची प्रतिक्रिया पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी व्यक्त केली.
विभाग मंडळे परवानाधारक विनापरवाना
कराड ग्रामीण ७३० २२८ ५०२
कराड शहर २९२ ११८ १७४
उंब्रज २७२ २६० १२
मसूर ११७ ६६ ५१
तळबीड ७० ४२ २८








