पोलिसांनी हटकल्याने केला हल्ला: सहाजणांना अटक, सूत्रधार गायब
प्रतिनिधी/ वास्को
रस्त्यावरील गोंधळ पाहून थांबलेल्या गस्तीवरील पोलिसांनी जाब विचारताच त्यांच्यावर सात परप्रांतीय युवकांच्या गटाने हल्ला चढवला. ही घटना मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास वाडे वास्कोतील महामार्गावर घडली. याप्रकरणी वास्को पोलिसांनी मांगोरहिल भागातील सहा युवकांना अटक केली आहे. या प्रकरणातील सूत्रधार अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या घटनेप्रकरणी वास्कोत तीव्र संताप व्यक्त होत असून हे परप्रांतीय लोक कोणाच्या जोरावर गुंडागर्दी करतात, असा संतापजनक सवाल जनमानसातून होत आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाडे वास्कोतील महामार्गावरील तळ्याशेजारच्या किंग्जटन प्लाझा या नव्या इमारतीसमोर पोलिसांवर हल्ला करण्याची ही घटना पहाटे तीनच्या सुमारास घडली. या रस्त्यावर काही वाहने रस्त्यावरच पार्क करण्यात आली होती आणि काही युवक गोंधळ घालीत होते. याच वेळी गस्तीवरील पोलिस आपल्या स्कॉरपियो जीपमधून या मार्गाने चिखली हॉस्पिटलच्या दिशेने जात होते. यात जीप चालक पोलिस रोहन खांडोळकर याच्यासह गणेश गावकर, चंद्रास मुरूडकर, नरेश गायकवाड या पोलिसांचा समावेश होता.
रस्त्यात वाहने ठेवून दंगामस्ती
रस्त्यावरील युवकांची मस्ती पाहताच पोलिस थांबले. त्यांनी खाली उतरून त्यांची चौकशी केली. पहाटेच्या वेळी इथे काय करता असा जाब विचारला आणि रस्त्यावरील वाहने हटवा, अशी सूचनाही त्यांनी केली. त्यामुळे त्या गटातील दोघे युवक खवळले. त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. इतर युवकांनीही त्यांना साथ दिली.
युवकांचा थेट पोलिसांवरच हल्ला
वादावादीनंतर त्या युवकांनी जाब विचारणाऱ्या पोलिसांवर हल्लाच केला. त्याला खाली पाडल्याने डोके आपटून रक्त वाहू लागले. आपल्या सहकाऱ्याची सोडवणूक करणाऱ्या इतर पोलिसांनाही त्या युवकांनी धक्काबुक्की केली. शिव्यांचा मारा केला. सदर युवकांना वठणीवर आणण्यासाठी आणखी पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले. परंतु तोपर्यंत ते युवक घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी मंगळवारी प्रथम संजय खरबंताल (25) व राज तारकर (30) या दोघांना पकडले. अमित कामत(24), श्रीकांत राठौड यांना रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा समीर मणियार (23) व राहुल करादी (23) यांनाही अटक करण्यात यश आले.
काँग्रेसकडून साळकर यांच्यावर आरोप
काँग्रेसचे स्थानिक नेते नंदादीप राऊत यांनी वास्कोत गुंडगीरीचे प्रकार वाढलेले असल्याचे दावा करून स्थानिक आमदार दाजी साळकर या परिस्थितीला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर हा भयानक प्रकार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व आरोपींविरूद्ध कडक कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
हल्लेखोर सर्व युवक मांगोरहिलचे
पोलिसांवरील या हल्ल्यात गुंतलेले सर्व युवक मांगोरहिल भागातील रहिवासी असून पहाटे तीनच्या सुमारास ते वाडेतील त्या रस्त्यावर का जमले होते? याचा उलगडा झालेला नाही. पोलिसांनी सर्व संशयितांवर याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. सात युवकांपैकी शिवकुमार होसमट या युवकाची काही वर्षांपूर्वी झालेल्या वास्कोतील विरेश हिरेमठ याच्या खून प्रकरणातून मुक्तता झालेली आहे. हे परप्रांतीय युवक कोणाच्या जोरावर गुंडागर्दी करतात, असा संतापजनक सवाल जनमानसातून व्यक्त होत आहे.
गुंडगिरीला सरकार थारा देणार नाही : साळकर
आमदार दाजी साळकर यांनी पोलिसांवर हल्ला करण्यात गुंतलेल्यांवर पोलिस कायद्यानुसार कारवाई करतील. आरोपी कुणीही असले तरी कसलीच तडजोड होणार नाही. आपले सरकार गुंडगिरीचे प्रकार सहन करणार नाही. घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. पोलिस जनतेच्या सुरक्षेसाठी असतात. त्यामुळे पोलिसांवर हल्ला करणे कोणीच सहन करणार नाही. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्था ढासळली असे म्हणणे योग्य नाही, असेही आमदार साळकर यांनी स्पष्ट केले.
हल्लाप्रकरणी लोकांमधून तीव्र प्रतिक्रिया
पोलिसांवरील या हल्ल्यात रक्त येईपर्यंत जखमी झालेल्या पोलिसांवर चिखलीतील उपजिल्हा इस्पितळात प्राथमिक उपचार करण्यात आले. या घटनेची वार्ता सकाळी उजाडताच वास्कोत पसरल्याने लोकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सामाजिक माध्यमांवर अनेकांनी त्या युवकांवर कडक कारवाई करून त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशाही प्रतिक्रिया उमटल्या.









