गुन्हा कळल्यावर हास्य रोखणे ठरेल अवघड
पोलिसांना आजवर तुम्ही गुन्हेगांवर कारवाई करताना पाहिले असेल. परंतु अखेर पोलिसांना कुठल्याही प्राण्याच्या विरोधात गुन्हा नोंद करताना पाहिले आहे का? बँकॉकमध्ये पोलीस स्थानकात घडलेला प्रकार गंभीर वातावरणाला मजेशीर किस्स्यात बदलणारा ठरला. पोलीस स्थानकात एक मांजर शिरले आणि त्याने तेथील पोलीस कर्मचाऱ्यांचा चावा घेतला. यानंतर पोलिसांनी रिसतर मांजराचा ‘मगशॉट’ घेतला.
पोलीस अधिकारी दा परिंदा पाकीसुक यांनी ही घटना फेसबुकवर शेअर केली. हे मांजर गुलाबी हार्नेस परिधान करून होते, त्याला एका स्थानिक इसमाने पोलीस स्थानकात आणले होते. पोलिसांना पाहिल्यावर मांजर अचानक आक्रमक झाले आणि काही पोलिसांना चावत पंज्याने वारही केले. या मांजरावर पोलिसांवर हल्ला करण्याचा आरोप आहे. या मांजराला ताब्यात घेतले जाईल, असे अधिकाऱ्याने फेसबुकवर त्याचे छायाचित्र शेअर करत थट्टेच्या स्वरुपात लिहिले आहे. मांजराला घरासारखे वातावरण देण्यासाठी अन्न अन् खेळणी पुरविण्यात आल्या. हे मांजर आरामात जगत आहेत, तर पोलीस त्रस्त झाले आहेत असेही पोस्टमध्ये म्हटले गेले आहे.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी मांजराच्या मालकाने पोलीस स्थानकाशी संपर्क साधत तिला आपल्यासोबत नेले. अधिकाऱ्यांनी मांजरासाठी एक मजेशीर पोलीस अहवालही तयार केला, ज्यात मला केवळ भूक लागली होती, मी कुणालाच चावू इच्छित नव्हते असे अधिकाऱ्याने मांजराच्या वतीने लिहिले. खास म्हणजे यावर मांजराने पंज्याने स्वाक्षरीही केली आहे.









