जिल्हाधिकारी आवारात पोलीस-वाहनधारकांत वादावादीच्या घटना
बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील बेशिस्त पार्किंगला शिस्त लावण्यासाठी रहदारी पोलिसांकडून प्रयत्न केले जात असले तरी वाहनधारकांकडून रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग करण्याचे प्रकार सुरूच आहेत. पोलिसांची नजर चुकवून रस्त्यावरच वाहने पार्किंग करण्यात येत आहेत. या प्रकारामुळे रहदारी पोलीसही हतबल झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या मोकळ्या जागेचा विकास करण्यात आला आहे. रस्ते रुंदीकरण करून वाहनांच्या पार्किंगसाठी सोय करण्यात आली आहे. असे असले तरी अनेक वाहनधारक रुंदीकरण केलेल्या रस्त्यावरच वाहने पार्किंग करत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून याठिकाणी रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. रस्त्यावर वाहने पार्किंग करणाऱ्यांना रहदारी पोलिसांकडून मज्जाव करण्यात येत असला तरी अनेक वाहनधारक वाहने पार्किंग करत आहेत. यामुळे रहदारी पोलीस व वाहनधारकांमध्ये वारंवार वादावादीच्या घटना घडत आहेत. सूचना करूनही वाहने पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. असे असले तरी अनेक वाहनधारक याकडे दुर्लक्ष करत वाहने लावत आहेत. या बेशिस्त वर्तनामुळे रहदारी पोलीसही हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.









