संग्राम काटकर,कोल्हापूर
GaneshUtsav Kolhapur : पुण्यात दहशवाद्यांशी जवळीक असलेल्यांना अटक केल्याच्या घटनेतून कोल्हापूर हिटलिस्टवर असल्याचा पोलीस प्रशासनाने अंदाज बांधला आहे. त्यामुळे अवघ्या 28 दिवसांवर आलेल्या गणेशोत्सव काळात मंडळांनी सतर्क राहून अवती-भोवती काय घडत आहे, याच्यावरही लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.याच पार्श्वभूमीवर मंडळांनी पोलीस प्रशासनाकडून गणेशोत्सवाची परवानगी घेण्यासाठीचे दुसरे आणि महत्वपूर्ण असे आवाहन केले आहे. दुसरीकडे मंडळांना लोकवर्गणी अधिकृतपणे जमवण्यासह उत्सवाचा हिशेब देण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाकडे नोंदणी ही करावीच लागेल, असे सांगत पोलीस प्रशासनाने गणेशोत्सवासाठी मंडळांना परवानगी देताना त्यांची धर्मादाय सहआयुक्त कोल्हापूर विभाग कार्यालयाकडे नोंदणी आहे की नाही हे तपासावे याबाबतचे निर्देश धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार यांनी दिले आहेत.
शहरात दरवर्षीचा गणेशोत्सव जवळ आला की मंडळांच्या नोंदणीबाबतचा विषय हमखास ऐरणीवर येत असतो. नेहमीची येतो पावसाळा याप्रमाणे पोलीस प्रशासन, धर्मादाय सहआयुक्त कार्यालय कोल्हापूर विभागाकडून मंडळांना नोंदणी करण्याचे आवाहन करत असते. असे असूनही अनेक मंडळे नोंदणीकडे दुर्लक्ष करत असल्याचे खुद्द पोलीस प्रशासन व धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाचे सांगणे आहे. कोल्हापूरात दीड हजारांवर सार्वजनिक मंडळे असून ते छोट्या-मोठ्या स्वरूपात गणेशोत्सव साजरा करत असतात. यापैकी कायमस्वरूपीत नोंदणी असलेल्या मंडळांव्यतरिक्त पाचशे ते सहाशेच्या आसपासच मंडळे गणेशोउत्सवासाठी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाकडे नोंदणी करतात. उर्वरीत मंडळे मात्र नोंदणीसाठी धजतच नाही. उत्सवासाठी तात्पुरत्या स्वरूपाची नोंदणी करण्याची धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाने मंडळांना मुभा दिली आहे. मात्र अनेक मंडळे तात्पुरत्या स्वरूपांच्या नोंदणीकडेही दुर्लक्ष करतात. शिवाय जी मंडळे धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाकडे नेंदणी करतात, त्यापैकी अनेक मंडळे नियमानुसार उत्सवाचा हिशेबही धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाकडे देत नाहीत, असेही कार्यालयाचे सांगणे आहे.
पोलीस प्रशासनाचेही सांगणे असे आहे, की मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्याला पोलीस प्रशासनाची अजिबात हकरत नाही. मात्र अनेक मंडळे उत्सव साजरा करण्यासंदर्भात आवश्यक असलेली परवानगी घेण्यासाठी व मंडळाची नेंदणी करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे येतच नाहीत. गतवर्षी शहरातील पाच पोलीस ठाण्यांअंतर्गत येणाऱ्या एकूण मंडळापैकी 849 मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी घेऊन मंडळांनी पोलीस नेंदणी केली आहे. उर्वरीत सहाशेहून अधिक मंडळे नोंदणीसाठी पुढेच येत नाहीत. पोलीस प्रशासनही सबुरीने घेऊन नोंदणी न करणाऱ्या मंडळांच्या गणेशोत्सवात व्यत्यय आणत नाही. मंडळांच्या कार्यकर्त्यांना त्रास होईल, असा कारवाईचा बडघा उगारत नाहीत.
मागिल वर्षापर्यंत पोलीस प्रशासन व धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाकडे नोंदणी न करणे, पोलीस प्रशासनाकडून कारवाई न होणे हे सारे खपून गेले होते. यंदाच्या गणेशोत्सवात मात्र नेंदणीकडे दुर्लक्ष करण्याचा मंडळाचा बेजबाबदारपणा चालू देणार नाही. कारण सध्याची परिस्थिती थोडी विचित्र बनली आहे. दहशतवादी कारवाईच्या दृष्टीकोनातून कोल्हापूरही धोकाच्या छायेत आहे. गेल्या दोन महिन्यापासून तसे संकेतही मिळत आहेत. अशातच अगदी 28 दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. उत्सव काळात मंडळांना अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन अर्लट मोड राहणार आहे. शिवाय मंडळांनाही सतर्क राहून सुरक्षेसाठी परिसरावर वॉच ठेवण्यासाठी पोलीसांना सहकार्य करावे लागणार आहे.
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांना कलम 401-क अंतर्गत तात्पुरत्या आणि कलम 19 नुसार कायम स्वरूपाची नोंदणी बागल चौक नजिकच्या धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात नोंदणी करता येते. बहुतांश मंडळांना या कलमांची माहिती नाही. जे मंडळ नोंदणी करत नाही, त्यांना उत्सवासाठी वर्गणी मागण्याचा कायद्याने अधिक नाही. तेव्हा कलमांनुसार मंडळाची नोंदणी करावी. त्यासाठी सर्व सहकार्य केले जाईल.
शिवराज नाईकवाडे (अधीक्षक : धर्मादाय सहआयुक्त कार्यालय कोल्हापूर विभाग)
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील मंडळांना पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे अनिवार्य आहे.पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी मंडळांना पार पाडावीच लागेल. येत्या 28 ऑगस्टपासून गणेशोत्सवाची परवानगी व नेंदणी कार्यक्रम सुरू केला जात आहे. मंडळांनी नोंदणीसाठी स्वयंस्फुर्तीने पुढे यावे.नोंदणीला जाताना सोबत धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात नोंदणी केल्याची कागदपत्रेही घेऊन जावीत. जे मंडळ नेंदणी करणार नाही, त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे.
अजित टिके (शहर पोलीस उपअधीक्षक)