पीकअप ताब्यात, तीन गुरांना जीवदान, संशयितांवर होणार अटक
प्रतिनिधा /वाळपई
मुस्लिमांचा ईद सण दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. यानिमित्ताने दोन दिवसापूर्वी पोलीस निरीक्षकांनी बेकायदेशीर गुरांची कत्तल प्रकारासंदर्भात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. असे असतानाच वेळगेतून तीन गुरांची तस्करी करत असल्या प्रकरणी वाळपई पोलिसांनी मडगाव भागातील एक वाहन ताब्यात घेऊन तीन गुरांना जीवनदान दिले. पोलीसांनी ही कारवाई शुक्रवारी संध्याकाळी केली. या संदर्भाचे कागदोपत्री सोपस्कार सुरू असून रात्री उशिरापर्यंत संशयितांना अटक होण्याची शक्मयता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ईद सणानिमित्त बेकायदेशीर गुरांची कत्तल केली जाण्याची शक्यता असून ती आपण कदापी खपवून घेणार नाही, असा इशारा पोलीस निरीक्षकांनी वाळपईत आयोजित मुस्लीम जमातीच्या प्रतिनिधीसमोर दिला होता.
सदर बैठकीला 48 तास उलटलेले नसताना सत्तरीतील वेळगे गावातून जीए-08-व्ही-3195 या पिकअपधून तीन गुरांची तस्करी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. गुरांची तस्करी होत असल्याची माहिती गोप्रेमींना मिळताच त्यांनी त्वरित वाळपई पोलीस स्थानकात फोनवरून माहिती दिली. पोलीस निरीक्षक प्रज्योत फडते यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पिकपचा पाठलाग करून ती ताब्यात घेतली. हा प्रकार शुक्रवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. पिकअपमध्ये दोन रेडे व एक बैल होता. तीनही गुरांना कत्तल करण्यासाठी मडगावला नेण्यात येत होते असा संशय व्यक्त केला. ज्या मालकांकडून ही गूरे खरेदी केली आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गोप्रेमांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सत्तरीत भटक्या गुरांची चोरी होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. वेळगेतून काल तीन गुरांच्या तस्करीचा प्रकार उघडकीस आल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. सुटका करण्यात आलेल्या तिनही गुरांना नाणूस येथील गोशाळेत ठेवण्यात येणार आहे. आगामी दोन दिवसांत अशा घटनांवर लोकांनी नजर ठेवावी, अशी विनंती गोप्रेमींकडून करण्यात येत आहे.
पोलिसांनी सतर्क रहावेः परब
ईद जवळ आली असून येणाऱया दोन दिवसांत कत्तलीसाठी गुरांची तस्करी होण्याची शक्मयता आहे. काही वर्षापूर्वी अशाच घटनेतून अनेक गुरांची सुटका केली होती. त्याची पुनरावृत्ती झाल्यास ती कदापि खपवून घेतली जाणार नाही. पोलिसांनी सतर्क रहावे तसेच नागरिकांनी अशा घटनांवर बारकाईने लक्ष ठेवावे, असे आवाहन गोरक्षा अभियानाचे हनुमंत परब यांनी केले आहे.









