कराड :
विद्यानगर परिसरात बुलेटच्या सायलेन्सरमधून येणाऱ्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी मंगळवारचा दिवस दिलासादायक ठरला. पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईत ७९ जणांवर दंडात्मक आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. विद्यानगरसह कराड शहर परिसरात बुलेटच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून ‘फटफट’ असा मोठा आवाज करणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. काही ठिकाणी सायलेन्सर थेट जागेवरच काढून घेतले गेले.
कराड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कराड शहर पोलीस ठाणे आणि वाहतूक शाखेच्या संयुक्त पथकाने सकाळी अचानक ही मोहीम राबवली. या कारवाईत केवळ बुलेटरवारच नव्हे तर कॉलेज परिसरात विनाकारण गर्दी करत मुलींना त्रास देणाऱ्या टवाळखोर युवकांनाही पोलिसांनी धडा शिकवला. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. विद्यानगर परिसरातील चार प्रमुख ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावून ही मोहीम अर्धा दिवस चालली. अचानक झालेल्या कारवाईने गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, संदीप सूर्यवंशी, राजेश माळी, निर्भया पथकाच्या दिपा पाटील, मयूर देशमुख, दीपक कोळी, संदीप घोरपडे, वैभव यादव यांनी भाग घेतला.
- टवाळखोरांवर कडक कारवाई होणारच
महिला, मुलींच्या सुरक्षेला पोलीस प्राधान्य देत आहेत. कराड हे विद्येचे माहेरघर समजले जाते. विद्यानगरी येथे लाखो महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. इथे जर कोणी मुलींना नाहक त्रास देत असेल किंवा टवाळखोरी करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई होईल. विशेषतः कारण नसताना महाविद्यालयांच्या आवारात फिरणारे आणि बुलटेचे सायलेन्सर बदलून धुमस्टाईल करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपअधिक्षक राजश्री पाटील यांनी दिला.








