वृत्तसंस्था/ वॉरसॉ (पोलंड)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या वॉरसॉ खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना अमेरिकेच्या क्लेरी लियूचा पराभव केला. त्याचप्रमाणे लिंडा नोसकोव्हा स्लोवाकियाची श्रीमेकोव्हा यांनीही शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले.
महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात स्वायटेकने अमेरिकेच्या क्लेरी लियुचे आव्हान 6-2, 6-2 असे संपुष्टात आणत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. स्वायटेकला या सामन्यात विजयासाठी 100 मिनिटे झगडावे लागले. स्वायटेक आणि नोसकोव्हा यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. आठव्या मानांकित नोसकोव्हाने व्हिक्टोरिया हेरुनकाकोवाचा 6-3, 6-3 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र, झेकच्या कॅरोलिना मुचेव्हाचे आव्हान दुसऱ्या फेरीतच स्लोव्हाकियाच्या श्रीमेकोव्हाने संपुष्टात आणले. श्रीमेकोव्हाने दुसऱ्या फेरीतील सामन्यात मुचेव्हाचा 7-5, 3-6, 7-5 असा पराभव केला.
त्याचप्रमाणे हॅम्बुर्ग युरोपियन खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत वाईल्ड कार्डधारक 19 वर्षीय नोमा अॅक्युगेने एकेरीची उपांत्य फेरी गाठताना मार्टीना ट्रिव्हेसेनचा 5-7, 6-4, 7-5 असा पराभव केला. आता अॅक्युगेन आणि डायना स्नेडर यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल.