लढाऊ विमाने तैनात : रशिया-युक्रेन युद्ध भडकण्याची चिन्हे
वृत्तसंस्था/ वॉर्सा
रशिया-युक्रेन संघर्षादरम्यान पोलंडही या युद्धात उतरताना दिसत आहे. रशियन ड्रोन्सनी पोलंडच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलंडने हे ड्रोन पाडले आहेत. पोलंड आणि नाटो युतीची एफ-16 लढाऊ विमाने बुधवारी सकाळी सक्रिय करण्यात आली आहेत. पाडलेली ड्रोन जप्त करण्यासाठी लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेनंतर आता नाटो देशांचा सदस्य असलेला पोलंड या युद्धात सक्रिय झाला. तसेच नाटो देश या युद्धाबाबत एकत्र येतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
युक्रेन-रशिया युद्धाची व्याप्ती आता वाढण्याची शक्यता खूपच वाढली आहे. देशाच्या हवाई हद्दीचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या रशियन ड्रोन पाडण्यासाठी नाटो लढाऊ विमाने तैनात करण्यात आल्याचा दावा पोलंडने केला आहे. याशिवाय, त्यांनी काही रशियन ड्रोन पाडले असल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे. पोलंडने रशियन ड्रोन पाडल्याचा केलेला दावा खूपच धोकादायक आहे, कारण पोलंड हा नाटोचा सदस्य असल्याने नाटोच्या कलम-5 नुसार, जर कोणत्याही नाटो देशावर हल्ला झाला तर सर्व नाटो देशांवर हल्ला झाल्याचे मानले जाते. म्हणूनच हे युद्ध भडकण्याची शक्यता खूप जास्त आहे.
पोलंडमध्ये किती रशियन ड्रोन घुसले होते आणि पोलिश हवाई दलाने किती ड्रोन पाडले हे सध्या स्पष्ट नाही. वॉर्सामधील चोपिन विमानतळ आणि मॉडलिन विमानतळावरील हवाई क्षेत्र देखील ‘अनियोजित लष्करी हालचाली’मुळे बंद करण्यात आले आहे. त्याचवेळी, युक्रेनियन माध्यमांनी किमान एक ड्रोन युक्रेनच्या पश्चिम सीमेजवळील पश्चिम पोलिश शहर रझेझोवकडे जात असल्याचे म्हटले आहे









