रुमानिया देशातील एका गावाच्या शोकांतिकेची ही कहाणी आहे. या देशातील ‘अपुसेनी’ पर्वतरांगांमधील हे गाव आहे. त्याचे गाव गेमाना असे आहे. या गावाला एका सरोवराच्या विषारी पाण्यात ‘बुडविण्यात’ आले आहे. ही घटना साधारणत: 50 वर्षांपूर्वीची आहे. मात्र, अशाही या सरोवराच्या तटावर आपण उभे राहिलो, तर विषारी पाण्यात बुडविल्या गेलेल्या या गावाचे दर्शन होते. त्यामुळे अनेक पर्यटक प्रत्येक वर्षी या हे विषारी सरोवर पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येतात.
या गावाला सरोवरात का बुडविण्यात आले, हा प्रश्न आपल्या मनात येणे साहजिक आहे .एका कम्युनिस्ट हुकूमशहाच्या लहरीमुळे हे घडले होते. 1977 मध्ये निकोलाय सेऊसेस्कू नामक डाव्या विचारसरणीचा शासक या देशाचा प्रमुख होता. त्याने एका मोठ्या तांब्याच्या खाणीचा शोध घेण्याचा प्रयत्न चालविला होता. तांब्याची या खाणीतून बाहेर पडणाऱ्या विषारी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक कृत्रिम सरोवर निर्माण करण्याचा त्याने निर्णय घेतला. यासाठी त्याने हे गेमाना गाव निवडले. या गावात मोठी लोकवस्ती होती. सरकारने गावकऱ्यांना आपली घरे आणि शेते सोडण्यास भाग पाडले. या गावाच्या बाजूला कृत्रिम सरोवर बांधण्यात आले. या सरोवरात जसजसा या तांब्याच्या खाणीतला कचरा टाकण्यात येऊ लागला, तसे सरोवराचे पाणी वरवर येऊन या गावात घुसू लागले. अखेर, संपूर्ण गावच या विषारी पाण्यात बुडाले. आज या गावातील चर्चच्या मनोऱ्याचे वरचे टोक तेवढे पाण्याबाहेर आहे. एकेकाळी जित्याजागत्या असलेल्या गावाची ती शेवटची आठवण आहे. आजही या गावासंबंधी लोकांना हळहळ वाटते. आर्थिक विकासाच्या चुकीच्या संकल्पना लागू केल्यास, अशा निर्णयांचा परिणाम काय होतो, हे या गावाच्या उदाहरणावरुन स्पष्ट होते. निसर्ग विरुद्ध आर्थिक समृद्धी या संघर्षात अखेर एका संपूर्ण गावाचीच अशा प्रकारे शोकांतिका झाली आहे.









