महापालिकेच्या निदर्शनास आला प्रकार : कुत्र्यांबाबत तक्रारी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
बेळगाव : शहरातील भटक्या कुत्र्यांवर विष प्रयोग करण्यासह मारहाण केली जात असल्याचे दिसून येत आहे. हे कृत्य बेकायदेशीर असून, कर्नाटक प्राणी कल्याण मंडळ आणि एडब्ल्यूबीआयच्या मार्गसूचीनुसार असे प्रकार करणे निषेधार्ह आहे. भटक्या कुत्र्यांपासून कुणालाही त्रास होत असल्याने त्यांनी महापालिकेच्या 08312405337 संपर्क साधावा, एखाद्या ठिकाणी पिसाळलेल्या कुत्रा आढळून आल्यास मनपाचे वरिष्ठ पशु निरीक्षक राजू संकण्णावर यांचा मोबाईल क्रमांक 9620336950 यावर संपर्क साधावा, असे आवाहन मनपा आयुक्त शुभा बी. यांनी केले आहे.
शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. कुत्र्यांचे निर्बिंजीकरण मोहीम थंडावली असल्याने जिकडेतिकडे कुत्र्यांचे कळप फिरताना दिसत आहेत. कुत्र्यांच्या कळपाकडून नागरिकांचा चावा घेण्याचे प्रकारही वाढले आहेत. कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात असली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अलीकडेच भटकी कुत्र्यांकडून दुचाकी वाहनांचे सिटदेखील फाडले जात आहेत. रस्त्यावरून ये-जा करणारे कुत्री कधी चावा घेतली याचा नेम नाही.
कुत्र्यांच्या बंदोबस्ताबाबत अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासनच
महापालिकेच्या सर्व बैठकांमध्ये कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जाते, पण अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासन देण्याव्यतिरिक्त काहीच होत नसल्याचे दिसून येत आहे. कुत्र्यांचे निर्बिंजीकरण करण्यासाठी अद्याप महापालिकेला नवा ठेकेदार मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त स्थानिक नागरिकांकडूनच करण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी कुत्र्यांवर विष प्रयोग करण्यासह मारबडव केली जात असल्याचे मनपाच्या निदर्शनास आले आहे. असे न करता नागरिकांनी महापालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.









