वार्ताहर/ नंदगड
कविता हा आत्म्याचा आवाज असतो. काळाच्या संवेदनात टिपतो तो कवी असतो. सभोवतालचे विश्व फुलवतो आणि त्यातून कवितेची नवी दिशा सापडते. जगणे हेच कवितेचे रुप आहे. प्रेमभाव, निसर्ग, शेतकरी, महापूर असा असंख्य भावनांचे प्रतिबिंद कवितेत उतरते. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत कविता जन्माला येते. असे वक्तव्य प्राध्यापक चंद्रकांत पोतदार यांनी कवी संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना व्यक्त केले. त्यांनी आपल्या खुमासदार शैलीत कविता सादर करून रसिकांना खिळवून ठेवले. संमेलनातील सहभागी कवी प्रा. गोविंद पाटील यांनी कविता श्रोत्यांना प्रबोधन करता करता अंतर्मुख करते. ज्याला कवितेचा अर्थ समजला त्याला जीवनातील गंभीर गुढतेचे आकलन होते. त्यांनी कवि संमेलनात ‘आरसा अन् काबाडकष्ट’ करणाऱ्या बापाची कविता, सहकारक्षेत्रातील ‘कर्जबाजारी अवस्थेची कर्ज’ कविता सादर केली.
कवी संतोष काळे यांनी ‘टाळी’ या कवितेतून सर्वसामान्य जनतेच्या जीवन प्रवासाचा मागोवा घेतला आणि सामान्य माणसाचा आध्यात्मिक लळा कसा विठ्ठलाशी जोडला जातो याचे सादरीकरण टाळी या कवितेतून केले. ग्रामीण आणि शहरी जीवनातील जगण्याच्या स्वरुपाचा वेद त्यांनी आपल्या कवितेतून घेतला. शहरातील बंद दारांच्या आतून येणारा आवाज आणि हरवत चाललेली माणुसकी आणि ग्रामीण भागात आजही माणुसकीचा झरा आटलेला नाही याचे सादरीकरण आपल्या कवितेतून केले. प्रा. चंदकांत पोतदार यांनी पाऊस आणि मुके श्वास या कवितेतून महापुराचा सामना करताना होणारी फरफट ही सर्वसामान्यांच्या जीवावर कशी उठते. याच सादरीकरण कवितेतून केले. अनगडीतील कवी संजीव वाटुपकर यांनी ‘माणसांचे थवे’ ही कविता सादर केली. कविता संमेलनाने उंची गाठली असताना संमेलनाध्यक्ष हिर्डेकर यांनाही कविता सादर करण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनीही आपली कविता सादर करून कवि संमेलनाची सांगता केली.









