प्रतिनिधी/ बेळगाव
शब्दगंध कवि मंडळातर्फे मराठी भाषा गौरव दिवस व जागतिक महिला दिनानिमित्त निमंत्रित कवयित्रींचे कविसंमेलन आयोजित केले आहे. रविवार दि. 9 मार्च रोजी सायंकाळी 4.30 वाजता सरस्वती वाचनालय, शहापूर येथे हे संमेलन होईल. संमेलनाध्यक्ष म्हणून कवयित्री व गझलकार वैशाली माळी उपस्थित राहणार आहेत. सूत्रसंचालन सातारा येथील दीपाली चरेगावकर करणार आहेत.
त्यांचा परिचय पुढीलप्रमाणे-
वैशाली माळी या एमबीए असून काव्य लेखन, गझल लेखन, ललित लेखन, सूत्रसंचालन व निवेदन हे त्यांचे आवडीचे छंद आहेत. त्या अनेक नामवंत संघटनांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व विविध समित्यांच्या सदस्या आहेत. करण प्रतिष्ठान व रंगतसंगत यांच्यातर्फे गझल प्रतिभा पुरस्कार, सुरेश भट युवा गझलकार पुरस्कार, कोमसाप उरण शाखेतर्फे विशेष पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
दीपाली या बी.कॉम. असून त्यांना वाचनाची व लेखनाची आवड आहे. त्यांनी सातारा आकाशवाणीवर निवेदक म्हणून काही काळ काम केले आहे. त्यांच्या अनेक कथा आणि कविता प्रकाशित झाल्या आहेत. श्रीमती सातारा, श्रीमती महाराष्ट्र हा बहुमानही त्यांना मिळाला आहे.









