कवी डॉ. संजय बोरूडे यांचे प्रतिपादन : शब्दगंध कवी संमेलन उत्साहात, विविध विषयांवरील कवितांचे सादरीकरण, रसिकांची भरभरून दाद
बेळगाव : ‘आयुष्याचा नरक झाल्याशिवाय सुचत नाही कविता’ असे म्हणत अहमदनगर येथील कवी डॉ. संजय बोरूडे यांनी कविता कशी तयार होते याचे वर्णन आपल्या कवितेतून सादर केले. एखाद्या दगडाला घाव घातल्यानंतरच एखादे सुंदर शिल्प तयार होते. त्याच पद्धतीने वेदनेतून आलेली कविता रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचते हे त्यांनी कवितेतून मांडले. त्यांच्या कवितांना बेळगावकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जागतिक मराठी दिनानिमित्त शब्दगंध कवी मंडळ बेळगाव व साहित्याक्षर प्रकाशन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कवी समजून घेताना’ या कार्यक्रमाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. सरस्वती वाचनालय येथे झालेल्या कार्यक्रमात कविता वाचनासह काव्य संमेलन पार पडले. या कार्यक्रमात डॉ. संजय बोरूडे यांनी सामाजिक, जागतिकीकरण, महिलांच्या वेदना, ग्रामीण भागाचे वास्तव या विषयांवर आधारित कविता सादर केल्या. व्यासपीठावर प्रा. अशोक अलगोंडी, उद्योजिका प्रिया कवठेकर, कवयित्री रचना, सुधाकर गावडे उपस्थित होते. वाचनालयाच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा. अशोक अलगोंडी यांनी प्रास्ताविक करत शब्दगंध कवी मंडळाच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. साहित्याक्षर प्रकाशनाच्या प्रमुख रचना यांनी पुस्तक प्रकाशनाविषयी माहिती दिली. संजय बुरूड यांनी वय वाढत जात तसं, आताच तर उतरला गोऱ्यांचा झेंडा, शिवराय तुम्ही, एक झाली चूक, मोबाईल व बायका, चाळीसीतील बायका अशा कविता सादर केल्या.
कवी संमेलनात सादर झाल्या कविता
दुसऱ्या सत्रात कवी श्रीकृष्ण केळकर यांच्या अध्यक्षतेखाली काव्य संमेलन पार पडले. अहमदनगर येथील कवयित्री रचना यांनी ‘चौकट मोडित काढलीस’, हे स्त्रियांच्या वेदनेचे काव्य सादर केले. स्नेहा कोळगे यांनी एकाकी जगणाऱ्या महिलांची व्यथा मांडली. श्रीकृष्ण केळकर यांनी आपल्या कवितेतून ‘आपुले अस्तित्व सिद्ध करा, हो आमचे भान’ या कवितेतून समाजातील सर्व घटकांचा परामर्ष घेतला. स्मिता पाटील यांनी गावाकडची माती, रोशणी हुंदरे यांनी आजकाल सोडलं आहे सजणं, प्रेमा मेणसे यांनी रानफुले, निकिता भडकुंबे यांनी जागा कर प्रत्येक मराठी माणसाला, चंद्रकांत देसाई यांनी स्वप्न कवितेचे, विद्या देशपांडे यांनी कळ्या टिपल्या, विद्याधर यादव यांनी मराठी भाषा, अंजली देशपांडे यांनी स्त्रीत्व अस्मितेचे, विजया उरणकर यांनी बेळगावचे साहित्य विश्व, अस्मिता देशपांडे यांनी जगू द्या ना, कृष्णा पारवाडकर, भरत गावडे, सुलोचना पाटील, नंदिनी दामले, आनंद मेणसे, अशोक सुतार यांनी कविता सादर केल्या.









