2034 पर्यंत टार्गेट पूर्ण करण्याचा पीएनजीआरबीचा दावा: सीएनजीची 18,336 स्टेशनही उभारणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (पीएनजीआरबी) 2034 पर्यंत 12.63 कोटी पीएनजी कनेक्शन आणि 18,336 सीएनजी स्टेशनचे ध्येय निश्चत केले आहे. सदरचे ध्येय पूर्ण करण्यासाठी पुढाकार आणि धोरणांचा वापर तीव्र केला आहे. यासाठी मंडळ राज्यांना प्रोत्साहन देत आहे. पेट्रोलियम नियामकाने ही माहिती दिली.
देशातील नैसर्गिक वायू पायाभूत सुविधांचा लक्षणीय विस्तार करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. सीजीडी क्षेत्रातील धोरणात्मक आणि ऑपरेशनल समस्या सोडवण्यासाठी पीएनजीआरबी नेतृत्वाने आसाम, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, तामिळनाडू, राजस्थान, जम्मू काश्मीर अंदमान आणि निकोबार बेटे आणि इतर राज्यांच्या मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांसोबत बैठका घेतल्या आहेत.
पीएनजीआरबीने म्हटले आहे की, ‘ही चर्चा घरगुती नैसर्गिक वायू आणि संकुचित नैसर्गिक वायूवरील व्हॅट तर्कसंगत करण्यावर केंद्रित आहे, जेणेकरून ग्राहकांसाठी स्वच्छ इंधन अधिक व्यावहारिक होईल. मंजुरींना गती देण्यासाठी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी राज्यांना व्यापक ण्उअ धोरणे तयार करण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक, मध्य प्रदेश, बिहार आणि राजस्थानसह 11 राज्यांनी जुलै 2025 पर्यंत सीजीडी धोरणे अधिसूचित केली आहेत.









