परीक्षार्थींना देणार यशाचा मंत्र, तणावमुक्तीचे धडेही मिळणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सकाळी 11 वाजता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाला संबोधित करतील. या कार्यक्रमासाठी देशभरात पाच कोटींहून अधिक नोंदणी झाल्या आहेत. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेपूर्वी पंतप्रधान देशभरातील परीक्षार्थी, पालक आणि शिक्षकांना संबोधित करत परीक्षेच्या ताणाचा सामना करण्यास मदत करतात. हा कार्यक्रम विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी थेट संवाद साधून आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केला जातो. दूरदर्शनसह पीएमओच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर या कार्यक्रमाचे थेट प्रसारण केले जाते.
‘परीक्षा पे चर्चा’ (पीपीसी 2025) ची आठवी आवृत्ती 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहण्यासाठी आणि परीक्षेत यश मिळविण्यासाठी गुरुमंत्र देतील. या महत्त्वाच्या चर्चेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ घेता यावा म्हणून राज्यभरातील शाळांमध्ये या विशेष कार्यक्रमाचे डिजिटल माध्यमातून थेट प्रक्षेपण केले जाईल. यासाठी विभागीय अधिकाऱ्यांना शालेय स्तरावर आवश्यक असलेली सर्व तयारी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पीपीसी 2025 कार्यक्रमात पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त आध्यात्मिक गुरू सद्गुरु, बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि विक्रांत मेसी, ऑलिम्पियन मेरी कोम आणि पॅरालिंपिक सुवर्णपदक विजेती अवनी लेखरा हे उपस्थित राहणार आहेत. सर्व परीक्षार्थींना, त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना ‘परीक्षा पे चर्चा’ 2025 पाहण्याचे आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ पुन्हा एकदा एका नवीन आणि उत्साही स्वरूपात सादर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे स्पष्ट केले.









