ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पीएमपीएमएल बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक हद्दीत हा अपघात झाला.
निलेश मल्लेश मित्रे (वय 22, रा. ताडीवाला रोड, पुणे) आणि आदित्य राजेंद्र देशमुख (वय 22, रा. तनीष सृष्टी, आळंदी देवाची) अशी अपघातातील मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
अधिक वाचा : आपला संकुचितपणा मराठीसाठी घातक
मिळालेल्या माहितीनुसार, गोऱ्हे बुद्रुक गावच्या हद्दीतील ॲक्वेरिअस हॉटेलच्या समोररून काल रात्री साडेदहाच्या सुमारास पीएमपीएमएलची बस (एम एच 12 आर एन 9071) खानापूरकडे जात होती. त्यावेळी एक दुचाकी डोणजेकडून पुण्याच्या दिशेने येत होती. या दुचाकीला बसने समोरुन जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरूणांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही तरुणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.