लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट कर्मचाऱ्यांची धावपळ : टप्प्याटप्प्याने पोहोचविण्याची व्यवस्था
बेळगाव : पीएम विश्वकर्मा योजनेमधून प्रशिक्षण घेतलेल्या नागरिकांना सुतार कामासाठीचे किट उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सध्या हे सर्व किट बेळगाव हेड पोस्ट ऑफीस कार्यालयात आले असून लाभार्थ्यांपर्यंत ते टप्प्याटप्प्याने पोहोचविले जात आहेत. प्रत्येक किटसाठी बारकोडची व्यवस्था करण्यात आली असून संबंधित लाभार्थ्यांपर्यंतच किट पोहोचतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. लघु उद्योगातून स्वयंरोजगार निर्माण व्हावा यासाठी कौशल्य विकास विभागाकडून अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत. सुतार तसेच इतर लघु उद्योगांसाठी पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली. ऑनलाईन माध्यमातून योजनेसाठी अर्ज दाखल करून घेण्यात आले.
यासाठी बेळगावमधील कौशल्य विकास विभागाकडून लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण झालेल्यांना थेट साहित्य पोहोचविले जाणार होते. त्यामुळे लाभार्थ्यांना या किटची प्रतीक्षा होती. मागील काही दिवसांपासून बेळगाव पोस्ट विभागामध्ये हे सर्व किट आले आहेत. किटचा आकार मोठा असल्यामुळे ते घरोघरी पोहोचविण्यासाठी विलंब होत आहे. या किटमध्ये बॅग तसेच सुतार कामासाठी लागणाऱ्या साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेतील लाभार्थ्यांना हे किट लवकरच मिळणार आहे.
किट पोहोचविताना पोस्ट कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ
किटचा आकार मोठा असल्यामुळे पोस्ट कर्मचाऱ्यांना घरोघरी पोहोचविणे अवघड होत आहे. लाभार्थ्यांनी भाडोत्री घरे बदलली असल्यामुळे ते शोधण्यासाठी विलंब होत आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांनी वर्षभरापूर्वी प्रशिक्षण घेतले होते, त्यांना अद्याप साहित्य आलेले नाही. परंतु ज्यांनी काही दिवसांपूर्वीच प्रशिक्षण घेतले, त्यांचे मात्र किट उपलब्ध झाले आहे. लाभार्थ्यांना लवकर किट उपलब्ध करून देण्यासाठी पोस्ट विभागाने सहकार्य करण्याची मागणी विश्वकर्मा सेवा संघाचे अध्यक्ष रमेश देसूरकर यांनी मंगळवारी भेट घेऊन पोस्ट अधिकाऱ्यांना केली.









