सिंधुदुर्ग येथील शिवपुतळा कोसळल्याने शिवभक्तांमध्ये नाराजी
बेळगाव : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. यामुळे देशभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. घाईगडबडीत पुतळा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यामध्ये दर्जा राखण्यात आलेला नाही. याची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर, आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी केली. कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजकोट किल्ल्यावर नौदलदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवपुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. हे काम अत्यंत घिसाडघाईने करण्यात आल्याने निकृष्ट दर्जाचे ठरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असणाऱ्या कंत्राटदारांच्या माध्यमातून हे काम करण्यात आले आहे.
त्यामुळे यामध्ये गैरकारभार झाल्याचा संशय असल्याचे त्यांनी सांगितले. पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. एरवी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनी मात्र याबाबत एक चकार शब्दही काढलेला नाही. हिंदुत्ववादी नेते गप्प का? असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला. महापुरुषांचे पुतळे उभारताना अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे. राजहंसगडावर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वामध्ये 55 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. ऊन, पाऊस वाऱ्याच्या माऱ्यातही हा पुतळा शाबूत आहे. यावरून कामाचा दर्जा दिसून येतो. सिंधुदुर्ग येथील काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येते. याची चौकशी व्हावी, याविरोधात जिल्हा काँग्रेसतर्फे आंदोलन करण्याचे नियोजन असल्याचेही सांगितले. यावेळी मनोहर बेळगावकर, मल्लाप्पा मुतगेकर आदी उपस्थित होते.









