द्विपक्षीय करारांसोबतच हिंदू मंदिराचे करणार उद्घाटन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारपासून संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी विस्तृत चर्चा करतील. तसेच अबू धाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटनही त्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
पंतप्रधान मोदी आणि अल नाह्यान द्विपक्षीय धोरणात्मक भागिदारी अधिक दृढ, विस्तारित आणि मजबूत करण्यावर चर्चा करतील आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील, असे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी सांगितले. दोन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी संयुक्त अरब अमिरातीचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांचीही भेट घेणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
स्पोर्ट्स सिटीमध्ये भारतीयांशी संवाद
पंतप्रधान दुबई येथे होणाऱ्या जागतिक सरकारी शिखर परिषद-2024 मध्ये सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी होतील. या शिखर परिषदेतील त्यांचे संबोधन महत्त्वाचे असेल. या मुख्य कार्यक्रमानंतर मोदी अबू धाबीमधील पहिले हिंदू मंदिर असलेल्या बीएपीएस मंदिराचे उद्घाटन करतील. तसेच झायेद स्पोर्ट्स सिटी येथे एका कार्यक्रमात युएईमधील भारतीय समुदायाला संबोधित करतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
भारत आणि युएई यांच्यात मजबूत राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांवर आधारित घनिष्ठ आणि बहुआयामी संबंध आहेत. ऑगस्ट 2015 मध्ये मोदींच्या युएईच्या ऐतिहासिक भेटीनंतर दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध व्यापक धोरणात्मक भागिदारीमध्ये वाढले. दोन्ही देश फेब्रुवारी 2022 मध्ये सर्वसमावेशक आर्थिक भागिदारी करार (सीईपीए) आणि जुलै 2023 मध्ये स्थानिक चलन सेटलमेंट (एलसीएस) प्रणालीवर स्वाक्षरी करतील. तसेच सीमापार व्यवहारांसाठी भारतीय ऊपया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या ‘दिरहाम’ वापरास प्रोत्साहन देतील.









