जी-7 शिखर परिषदेत घेणार भाग: ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलाच विदेश दौरा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:च्या पहिल्या विदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. यादरम्यान ते तीन देशांचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान मोदी हे रविवारी सकाळी सायप्रससाठी रवाना झाले. सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडॉलाइड्स यांच्या निमंत्रणावर पंतप्रधान मोदी हे 15-16 जून रोजी सायप्रसच्या अधिकृत दौऱ्यावर असतील. पंतप्रधान मोदी हे 16-17 जून रोजी कॅनडातील जी-7 शिखर परिषदेत भाग घेणार आहेत. यानंतर ते क्रोएशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कॅनडात होत असलेल्या जी-7 परिषदेदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पंतप्रधान मोदींची भेट होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदी हे चालू आठवड्यात कॅनडात आयोजित होणाऱ्या जी-7 शिखर परिषदेत भाग घेतील. तेथे त्यांची अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चर्चा होण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्षविराम करविण्यास मदत केल्याचा दावा ट्रम्प यांनी वारंवार केला असल्याने या भेटीला महत्त्व प्राप्त होणार आहे. भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळला होता.
कूटनीतिक स्वरुपात महत्त्वपूर्ण
पंतप्रधान मोदींचा हा विदेश दौरा कूटनीतिक स्वरुपात अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. सीमापार दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांच्या विरोधात एक मजबूत आघाडी निर्माण करण्याचे लक्ष्य भारताने बाळगले आहे. पंतप्रधान मोदी हे 16-17 जून रोजी कॅनडाच्या कनानास्किस येथे असणार आहेत. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी जी-7 शिखर परिषदेसाठी मोदींना आमंत्रित केले आहे. मोदींचे हे सलग 6 वी जी-7 शिखर परिषद असणार आहे. यंदाच्या शिखर परिषदेदरम्यान अनेक द्विपक्षीय बैठका होण्याची देखील शक्यता आहे. पंतप्रधान मोदी हे जी-7 शिखर परिषदेदरम्यान अनेक देशांच्या प्रमुखांना भेटणार असल्याचे विदेश मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
दहशतवादविरोधी मोहीम
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी भेट झाल्यास पंतप्रधान मोदी हे सीमापार दहशतवाद विरोधातील कारवाईच्या मुद्द्यावर जोर देणार आहेत. भारताने मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानात स्ट्राइक केला होता. या कारवाईत केवळ सीमापार दहशतवादालाच लक्ष्य करण्यात आले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यास मदत केल्याचे ट्रम्प यांनी अनेकदा म्हटले आहे. तसेच त्यांनी व्यापाराचा अस्त्र म्हणून याकरता वापर केल्याचा दावा केला होता.
ट्रम्प यांच्यासोबत चर्चा
भारत-पाक संघर्षादरम्यान अमेरिकेने कुठलीच मध्यस्थी केली नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिका भारताच्या संपर्कात होता, परंतु अमेरिकेने संघर्षविराम करविण्यात कुठलीच भूमिका पार पाडली नाही. व्यापाराबद्दलही कुठलीच चर्चा झालेली नाही असे भारताच्या विदेश मंत्रालयाने स्पष्ट केले हेते. तसेच ट्रम्प प्रशासनाच्या पाकिस्तानी सैन्यासोबतच्या कथित संबंधांमुळे भारत-अमेरिका संबंध काहीसे तणावपूर्ण झाले आहेत.









