वृत्तसंस्था/ जामनगर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या गुजरात दौऱ्यादरम्यान सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात पूजा आणि प्रार्थना केली. त्यांनी मंदिर संकुलातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यालाही आदरांजली वाहिली. पंतप्रधान मोदी शनिवारपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून त्याची सुरुवात जामनगर विमानतळापासून झाली.
पंतप्रधान मोदींचे विमान शनिवारी रात्री जामनगर विमानतळावर उतरले. पंतप्रधान मोदींनी विमानतळापासून जामनगरमधील पायलट हाऊसपर्यंत 5 किमी लांबीचा रोड शो केला. या काळात त्याचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात समर्थक-कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. येथील सर्किट हाऊसमध्ये रात्रीच्या मुक्कामानंतर त्यांनी रविवारी रिलायन्स फाउंडेशनच्या प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र, वांतारा येथे भेट दिली. त्यानंतर रविवारी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभास पाटणस्थित पहिल्या शिव मंदिराला भेट देत पूजा-अर्चा केली. यासंबंधीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता सोमवारी ते जागतिक वन्यजीव दिनानिमित्त पंतप्रधान मोदी गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील सासन गीरला भेट देतील. याप्रसंगी ते जंगल सफारीचा आनंद घेतील. पंतप्रधान आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात जामनगर, द्वारका आणि गीर जिह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतील.









