ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक पार पडली. यावेळी या बैठकीत नरेंद्र मोदींनी इंधन दरांवरुन राज्यांना सुनावलं आहे. मोदींनी इंधनवारील व्हॅट कमी न करण्याच्या राज्यांची थेट नावच घेतली आणि खडे बोल सुनावले. आता राज्य सरकारांनी तेलावरील कर कमी करावा, असंही त्यांनी सांगितलं. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली.
पंतप्रधान मोदींची ही बैठक राज्यात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांसदर्भात होती. पण राज्यांमध्ये वाढत चालल्या तेलाच्या किमती वरून पंतप्रधांनी इंधन दरवाढीचा उल्लेखही केला. आर्थिक निर्णयांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय आवश्यक असल्याचे मोदी म्हणाले. पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol and diesel) वाढत्या किमतींचा जनतेवरील बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नोव्हेंबरमध्ये उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर राज्य सरकारांनाही व्हॅट कमी करण्यास सांगण्यात आले. काही राज्यांनी केंद्राची आज्ञा मानून जनतेला दिलासा दिला, मात्र काही राज्यांनी तसे केले नसल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केले. महाराष्ट्रासह केरळ, आसाम, तेलंगणा आणि पश्चिम बंगालने पेट्रोल आणि डिझेवरील दर कमी करावा, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, “नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी काही राज्यांनी व्हॅट कमी केला. परंतु कर्नाटक आणि गुजरात जवळच्या काही राज्यांनी व्हॅट कमी न करता साडे तीन हजार ते पाच हजार कोटी रुपये कमावले आहेत. गेल्या नोव्हेंबर महिन्यात मी सर्वांना व्हॅट कमी करण्यासाठी विनंती केली होती. मी कोणावर टीका करत नसून विनंती करत आहे. त्या राज्यातील नागरिकांच्या भल्यासाठी सांगत आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, झारखंड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या राज्यांनी ऐकलं नाही आणि त्यांच्या राज्यातील नागरिकांवरील ओझं कायम राहिलं. या राज्यांनी किती महसूल कमावला हे मला सांगायचं नाही. पण आता देशहितासाठी सहा महिन्यांनी का होईना व्हॅट कमी करत लोकांना याचा लाभ दिला पाहिजे,” असा सल्ला यावेळी नरेंद्र मोदींनी दिला.