विशेष अतिथींच्या उपस्थितीत आज दिल्लीत स्वातंत्र्यदिन सोहळा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशभर आज मंगळवारी स्वातंत्र्यदिनाचा मुख्य सोहळा साजरा होणार आहे. ‘अमृतमहोत्सवी’ वर्षाच्या समारोपामुळे आजचा हा सोहळा देशवासियांसाठी विशेष असणार आहे. या सोहळ्यासाठी देशातील विशेष निमंत्रितांसोबतच विदेशातील काही निवडक पाहुण्यांनाही आमंत्रित करण्यात आलेले आहे. राजधानी दिल्लीतील मुख्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकविल्यानंतर देशाला उद्देशून भाषण करणार आहेत. तेथून ते दहाव्यांदा देशाला संबोधित करतील. यावेळी पंतप्रधानांचे भाषण विशेष असेल असे मानले जात आहे. ध्वजारोहण सोहळ्यानंतर विविध सुरक्षा पथकांकडून तिरंग्याला मानवंदना दिली जाणार आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानाला अनुसरून शनिवारपासूनच देशात तिरंगा यात्रेसह विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. राजधानी दिल्लीपासून गावोगावी या सोहळ्याचा उत्साह ओसंडून वाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना तिरंग्यासह सेल्फी फोटो हर घर तिरंगा वेबसाईटवर अपलोड करण्यास सांगितले आहे.
देशभरातील 1,800 विशेष अतिथी
दिल्लीतील लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी 1800 विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मुख्य कार्यक्रमात सरपंच, शिक्षक, परिचारिका, शेतकरी, मच्छीमार, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात गुंतलेले कामगार, खादी क्षेत्रातील कामगार, राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे कर्मचारीही येणार आहेत. याशिवाय अमृत सरोवर प्रकल्प आणि हर घर जल योजनेचे कर्मचारी, महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे दोन लाभार्थी यांनाही लाल किल्ल्यावर पाचारण करण्यात आले आहे.
अभेद्य सुरक्षा व्यवस्था
स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला दिल्लीत दहशतवाद्यांकडून ड्रोन हल्ला केला जाऊ शकतो, असा इशारा गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आल्यामुळे दिल्लीत सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कडेकोट सुरक्षेमुळे राजधानीला छावणीचे स्वऊप प्राप्त झाले आहे. देशात अन्यत्रही कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दिल्लीतील मुख्य सोहळ्यावर एक हजार पॅमेऱ्यांच्या मदतीने लक्ष ठेवले जाणार आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी दिल्लीत जवळपास दोन हजारहून अधिक मोठ्या आसामी हजेरी लावणार आहेत. याशिवाय आठ ते दहा हजार दिल्लीकरही उपस्थित राहण्याची शक्मयता आहे.









